अंगणवाडी ‘फ्री पॅकेज फूड’ पद्धती अन्यायकारक
By admin | Published: February 1, 2016 02:40 AM2016-02-01T02:40:56+5:302016-02-01T02:40:56+5:30
अंगणवाडी लाभार्थ्यांना गरम व ताजा पुरवण्याचे कंत्राट संपत आलेले असताना, शासन ‘फ्री पॅकेज फूड’ या नव्या पद्धतीने निविदा काढण्याबाबत विचाराधीन आहे
मुंबई : अंगणवाडी लाभार्थ्यांना गरम व ताजा पुरवण्याचे कंत्राट संपत आलेले असताना, शासन ‘फ्री पॅकेज फूड’ या नव्या पद्धतीने निविदा काढण्याबाबत विचाराधीन आहे. मात्र, या पद्धतीमुळे मुंबई शहर आणि उपनगरांतील बचत गट, महिला मंडळे व महिला संस्था यांचे खच्चीकरण होणार असल्याचे कारण देत, अंगणवाडी आहार पुरवठाधारक संघटनेने विरोध केला आहे.
संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या साडेतीन वर्षांपासून एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाड्यांना पूरक पोषण आहार पुरवण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरांतील एकूण ३३ प्रकल्पांत अंदाजे १ हजार ३०० महिला बचत गट, महिला मंडळे आणि महिला संस्था कार्यरत आहेत. नव्या पद्धतीनुसार फ्री पॅकेज फूड शिजवण्यासाठी नागरी सुविधा उपलब्ध नाहीत. त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री सुमारे ४० ते ५० लाख रुपयांपर्यंतची आहे. जी छोट्या बचत गटांना घेणे अशक्य आहे. झोपडपट्टी वस्त्यांमध्ये पोषक आहार शिजवण्यासाठी इंधनाचा, आगीचा आणि पाण्याचा प्रश्न या सर्व बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे थोडा बदल करून, ताजा आणि गरम आहार पद्धत आणण्याची तयारी संघटनेने दाखवली आहे. मात्र, सर्व संस्था, मंडळ आणि गटांकडे दुर्लक्ष करून अशा प्रकारे नवी योजना राबवण्यास संघटनेने विरोध दर्शवला आहे. (प्रतिनिधी)