Join us  

अंगणवाडी सेविकांचा संप मागे

By admin | Published: April 02, 2017 12:07 AM

राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी १ एप्रिल रोजीपासून पुकारलेला राज्यव्यापी बेमुदत संप तात्पुरता स्थगित केला आहे.

मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी १ एप्रिल रोजीपासून पुकारलेला राज्यव्यापी बेमुदत संप तात्पुरता स्थगित केला आहे. महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने जून महिन्यापर्यंत संपाला स्थगिती देण्याचा निर्णय घोषित केला आहे.कृती समितीचे निमंत्रक कॉ. दिलीप उटाणे म्हणाले की, अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढीसाठी नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार वित्तविभागाकडे एक महिन्याच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन मुंडे यांनी दिले आहे. शिवाय वित्त विभागाकडून प्रस्ताव आल्यावर, तो सकारात्मक करून राज्य मंत्रिमंडळ बैठकीसमोर मांडला जाईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठीही प्रयत्न करण्याचे मुंडे यांनी संघटनेला आश्वासित केले. त्यामुळे जून महिन्यापर्यंत संप स्थगित करण्याचा निर्णय सर्व नेत्यांनी घेतला आहे. दरम्यान, मुंबईतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नियमित मानधन थेट बँक खात्यात जमा करण्यासंबंधात एका महिन्यात अंमलबजावणी केली जाईल, तर राज्याच्या इतर भागांत दोन महिन्यांत मानधन नियमित वितरित करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन मुंडे यांनी दिले आहे. मात्र, संबंधित आश्वासनावर जून महिन्यापर्यंत ठोस कृती दिसली नाही, तर पुन्हा संपाचे हत्यार उपसले जाईल. त्या वेळी आंदोलन मागे घेणार नसल्याचे कृती समितीच्या निमंत्रक शुभा शमीम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)