मुंबई : राज्याच्या एकात्मिक बालविकास योजनेत काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची निवृत्तीनंतर अत्यंत हलाखीची परिस्थिती झाली आहे. सरकारच्या या वेळकाढू भूमिकेविरोधात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने मंगळवारी धडक मोर्चाची हाक दिली आहे. सरकारला इशारा देण्यासाठी कृती समितीने सोमवारी आझाद मैदानात धरणे दिले.आघाडी सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर एकरकमी लाभ म्हणून, सेविकांना १ लाख आणि मदतनिसांना ७५ हजार रुपये देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या दोन वर्षांत १ हजार ५०० कर्मचाऱ्यांनी निवृत्ती घेतल्यानंतर केवळ ६०० कर्मचाऱ्यांना पेन्शन दिल्याचा दावा कृती समितीने केला आहे. ९०० कर्मचारी पेन्शनसाठी सरकार दरबारी खेटे घालत असल्याची माहिती, कृती समितीचे निमंत्रक शुभा शमीम यांनी दिली.कृती समितीचे दिलीप उटाणे म्हणाले की, ‘राज्यात १ ते २ वर्षे कर्मचाऱ्यांना पेन्शनच मिळाली नसल्याच्या तक्रारी संघटनेकडे आल्या आहेत. त्यात सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात अंगणवाडीसाठीच्या निधीत सुमारे ६२ टक्के एवढी कपात केली आहे. त्यामुळे सरकारला अंगणवाड्या बंद पाडायच्या आहेत, हे दिसून येते. त्यामुळेच सरकारला जाब विचारण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी तीव्र आंदोलन करणार आहेत, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अंगणवाडी कर्मचारी हलाखीत
By admin | Published: April 05, 2016 2:01 AM