- चेतन ननावरे
मुंबई, दि. 12- अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप चिघळल्याचं पाहायला मिळतं आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतची शिष्टमंडळाची बैठक फिस्कटली आहे. शिष्टमंडळातील प्रतिनिधी दिलीप उटाणे यांनी सांगितले की, येत्या ८ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याच्या मुद्द्यावर संप मागे घेण्याचं आवाहन मुनगंटीवार यांनी केलं. पण निर्णय होत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका कृती समितीने घेतली. परिणामी, चर्चा फिस्कटल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय कृती समितीने जाहीर केला आहे. त्यात सरकारने खोटं आश्वासन दिलं म्हणून प्रत्येक जिल्ह्यात सरकारची अंत्ययात्रा काढणार असल्याचं उटाणे यांनी स्पष्ट केलं आहे.
सोमवारपासून बेमुदत संप पुकारलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा मंगळवारी आझाद मैदानावर धडकला. हजारोंच्या संख्येने एकवटलेल्या कर्मचाऱ्यांनी आजाद मैदान हाऊसफुल्ल झालं आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांनी महापालिका मार्गाचा पदपाथ कब्जा केला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील पोषण आहार व लसीकरण सेवा ठप्प पडली आहे. त्यामुळे कुपोषण वाढीची भीती व्यक्त केली जात आहे.
शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण केली नसल्याचा आरोप करत अंगणवाडी कर्मचा-यांचा मोर्चा
शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसाठी महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती स्थापन केली होती. या समितीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना इतर राज्यांत मिळणारे मानधन व इतर सुविधा यांचा अभ्यास करून राज्यातील ९७ हजार सेविका आणि ९६ हजार मदतनीस, तसेच १२ हजार मिनी अंगणवाडी सेविका यांना सेवा ज्येष्ठतेनुसार मानधनवाढीचा अहवाल शासनाला दिला. मात्र शासन मानधनवाढ करीत नसल्याने कृती समितीने ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्याची घोषणा केली. तसेच कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी २२ ऑगस्टपासून असहकार आंदोलनात सहभागी झाले आहेत, असे कृती समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे यांनी सांगितले.