Join us

वर्सोवाच्या ३२ वर्षीय तरुणीसाठी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन ठरली देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:06 AM

मनोहर कुंभेजकरमुंबई : सध्या कोरोनाच्या काळात ऑक्सिजनची पातळी नियंत्रणात असणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी वेळीच ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध ...

मनोहर कुंभेजकर

मुंबई : सध्या कोरोनाच्या काळात ऑक्सिजनची पातळी नियंत्रणात असणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी वेळीच ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध होणे गरजेचे आहे.

वर्सोवा विधानसभा संघटक शैलेश फणसे यांनी वर्सोव्यात ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर बँकेची अनोखी संकल्पना राबवली आणि विशेष म्हणजे वर्सोवा, सात बंगला येथील शांतिनिकेतन येथे राहणाऱ्या प्रभाग क्रमांक ५९ चे शिवसेनेचे उपविभागप्रमुख शंकर डांगले यांच्या ३२ वर्षीय मुलींसाठी सदर ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर बँक ही देवदूत ठरली आहे.

वयाच्या आठ वर्षांनंतर किरण चालायला लागली. वयाच्या २५ व्या वर्षी तिच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या असून, महिन्याला १२ ते १३ वेळा डायलिसिस करावे लागते.

या संदर्भात किरणचे वडील शंकर डांगले यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, शनिवार दि. २९ मे रोजी किरण डांगले हिची तब्येत अचानक खालावली आणि तिला श्वास घेण्यास खूपच त्रास होऊ लागला. ऑक्सिजन पातळी ८२ खाली गेली. त्यामुळे ताबडतोब प्रभाग क्रमांक ५९ चे उपशाखाप्रमुख राजेश रासम यांना फोन केला. त्यांनी त्वरित फणसे यांना सांगून यारी रोड मुस्लिम समाजाला दिलेले उपशाखाप्रमुख तारिक पटेल यांच्याकडून ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन आणून दिले.

दरम्यान, बाजार व उद्यान समिती अध्यक्ष व स्थानिक नगरसेविका प्रतिमा खोपडे यांनी किरणसाठी सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये बेडचे त्वरित आयोजन केले.

मात्र, तिला हॉस्पिटलमध्ये जायची वेळ आली नाही. शैलेश फणसे यांची ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर बँक ही किरणसाठी देवदूत ठरली. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि तीन दिवसांत मुलीची ऑक्सिजन पातळी आता ९७ आहे. वेळीच मुलीला ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन उपलब्ध झाल्याने तिचे प्राण वाचले आहेत, असे शंकर डांगले यांनी सांगितले.