26 जुलै 2005 साली अडकलेल्या 100 गरजू नागरिकांना मदतीचा हात पुढे करणारे गोरेगावचे देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:08 PM2018-07-26T23:08:32+5:302018-07-26T23:08:34+5:30
26 जुलै 2005 साली मुंबईत एका दिवसात चेरापुंजीला पडतो एवढा 925 मिमी महाप्रलयकारी पाऊस पडला.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई- 26 जुलै 2005 साली मुंबईत एका दिवसात चेरापुंजीला पडतो एवढा 925 मिमी महाप्रलयकारी पाऊस पडला. मात्र आजही 13 वर्षे झाले तरी या घटना आठवल्यावर हृदयाचे काळीज धडधड होते. 26 जुलै व 27 जुलै या दोन दिवशी पश्चिम उपनगरात अंधेरी ते मीरा रोडपर्यंत अडकलेल्या 100 गरजू नागरिकांना मदतीचा हात पुढे करून स्वत:च्या मारुती गाडीने घरपोच सुखरूप पोहोचवले. गोरेगाव रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष उदय चितळे हे खरे देवदूत ठरले.
या दिवसाच्या आठवणी सांगताना 26 जुलैचा थरकाप उडवणारा पाऊस आणि 100 नागरिकांना घरी कसे सुखरूप पोहोचवले याची कहाणी त्यांनी सांगितली.
आज सकाळी उठल्यावर मालाड पोतदार रोडवरून माझ्या पत्नी स्मिताच्या स्टेट बँकेवरून पुढे गेलो आणि लक्षात आलं आज २६ जुलै. तोच तो दिवस. आणि आठवणींचा पट डोळ्यापुढे जणू उलगडू लागला.
२६ जुलै २००५ रोजी सकाळी उठलो आंघोळ, देव पूजा, नाश्ता करून पालघरला काही कामासाठी निघालो. ट्रेन पकडून पालघरचे काम उरकून विरारला आलो, तिथून बोरिवली, गोरेगाव करून पायी चालत दुपारी २च्या सुमारास घरी पोहोचलो. सकाळपासून पाऊस कमी जास्त होत पडत होता. हळूहळू अंधार वाढत होता. माझी कन्या जान्हवी अंधेरीहून कॉलेज मधून घरी आली.पाऊस जोरात पडत असल्याने लोकल ट्रेन बंद झाल्या व त्यामुळे कॉलेज लवकर सोडलं होत .काळोख दाटत चालला होता.तितक्यात पत्नी स्मिताचा फोन आला. कुठे आहेस ? पाऊस वाढतोय बँकेत गाडी घेऊन ये ,वाट बघतेय . मारुती काढली रस्त्यावर आलो . पाऊस बदाबदा कोसळत होता . बँकेत गेलो स्मिता व तिची एक सहकारी रेखा क्षीरसागर या दोघीना घेऊन गोरेगावला आलो. नशिबाने मी, पत्नी , कन्या सुखरूप घरी पोचलो होतो.संध्याकाळचे सात वाजले होते.टीव्ही बंद . टेलिफोन बंद , मोबाइल बंद,हळू हळू सर्वच बंद पडले.पाऊस ताशा वाजवत होता .स्मिताने मेणबत्तीच्या प्रकाशात जेवण बनवले , व आम्ही कॅण्डल लाईट डिनर कसेंबसे पार पाडले. आणि पावसाचा आवाज ऐकत बसून राहिलो .डोक्यात काहीतरी चमकल .काहीतरी केलं पाहिजे .मारुतीची चावी घेतली आणि पटकन गोरेगाव पूर्व चेक नाक्या जवळील आमच्या दुध सागर सोसायटीतून घराबाहेर पडलो .अश्या वेळी काहीही न सांगता बाहेर जाणं हा सोपा मार्ग असतो , बाहेर पडण्याचं कारण सांगितलं तर घरातून विरोध होण्याची शक्यता जास्त असते.
घराखाली आलो,सोसायटी काळोखात बुडालेली .रस्त्यावर आलो ,रस्त्यावरचे दिवे बंद,गोरेगाव पूर्व चेक नाक्या जवळील सिबा रोडवर आलो .एक कुटुंबाने हात केला .मी गाडी थांबवली , त्यांनी म्हटलं आम्ही जवळच राहतो जरा घरी सोडा .त्यांना गाडीत घेऊन त्यांच्या घराशी सोडलं. ते कुटुंब गोरेगाव पश्चिमेला मॉलमध्ये गेलं व तुफान पावसात अडकलं होत .कसेबसे चालत पूर्वेला पोचले व आमची भेट झाली .त्यांना सोडून मग हायवेवर दिंडोशी नाक्यावर पोचलो .बघतो तर अंधेरीकडे जाणाऱ्या गाड्यांची रांगच रांग लागली होती. दूपारपासून दूर अंतरावरून थांबत थांबत आल्यामुळे पेट्रोल संपलं , बॅटरी उतरली होती . गाड्या सोडून माणसं रस्त्याच्या कडेला निवारा शोधात होती. दिंडोशी सिग्नलला काही माणसं सूटबूट घालून पाऊस झेलत उभी होती .एक दोघांकडे गिटारीसारखी वाद्य होती.त्यांनी हात केला .त्यांना गाडीत घेऊन फिल्म सिटी रोडला सोडलं .ते ऑर्केस्ट्रामधले कलाकार होते व दिल्लीहून मुंबईत पोचले होते व विमानतळावरून निघून पावसात अडकले होते .त्यांना सोडून परत दिंडोशी नाक्याला आलो जे भेटले त्यांना दिंडोशी येथील नागरी निवारा, पिंपरीपाडा, फिल्म सिटी जिथे म्हणाले तिथे सोडलं . गाडीच्या काचेवर पावसाचे थेंब गारांसारखे आदळत होते . ५ फूटावरचसुद्धा काहीच दिसत नव्हतं . रस्त्यावर चालणारी माणसं , नखशिखांत भिजली होती ,बूटात पाणी भरलं होत, बॅकपॅक भरून वाहत होता, लॅपटॉप गाठाळला होता, मोबाईल एक निरुपयोगी खोका होता. माणसं जड पावलांनी पुढे सरकत होती .जेवढ्याना शक्य होत तितक्या नागरिकांना त्यांच्या घरी सुखरूप पोहाचत केलं.आणि रात्री १२ वाजता घरी पोचलो . अंधारात बायकोचा लाल चेहेरा बघितला. काहीही न सांगता बाहेर गेल्यामुळे तिच्या मनात काळजीचे ढग दाटले होते .मुलीला कॉन्फिडन्स होता बाबा कुठेतरी कोणालातरी मदत करत फिरत असणार .
दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो . साडू आमचेकडे थांबले होते , त्यांना मालाड सबवेला सोडलं ,ते तिथून पुढे ऑफिसला निघून गेले.काय करायचं हे मनाशी ठरलेलंच होतच.मालाड वरून सरळ हायवेला लागलो. दोनजण भेटले त्यांना अंधेरीला सोडलं व फ्लायओव्हर चढलो .तिकडे तरुणांच्या गटाने अडवला , म्हणाले पुढे जाऊ नका उलटे फिरा व या लोकांना मालाडला सोडा. मी म्हटलं बसा गाडीत .त्याच कामासाठी आजचा दिवस दिलाय .त्या लोकांना मालाडला सोडून पुढची फेरी अंधेरी कडे , पुन्हा गाडी भरली ,आलो कांदिवलीला, पुन्हा गाडी फिरली अंधेरीकडे गाडी फिरवली.नंतर बोरिवली , मीरा रोडला प्रवासी सांगतील तिथे जात राहिलो .लोक त्यांचे अनुभव सांगत होते कोणी चर्चगेट ,दादर ,हाजी अली ,बांद्रयापासून अंधेरी पर्यंत येऊन पोचले होते .सगळ्यांचा युनिफॉर्म एकच ,चिंब भिजलेले आणि अंगाला चिकटलेलं ओले कपडे . माणसं उतरत होती थँक्स म्हणत होती पुन्हा भेटा म्हणत होती ऑफिसचे पत्ते देत होती . आता रस्त्यावर काही जणांनी बिस्कीट पुढे पाण्याच्या बाटल्या वाटप सुरु केले होते . हायवे वरच्या गाड्या धक्के मारून बाजूला काढल्या जात होत्या , मेकॅनिक लोक पैसे न घेता गाड्या सुरु करायला मदत करत होते . सगळं बघत बघत मनातल्या मनात गणित मांडत होतो . शेवटी जेव्हा थांबलो तेव्हा हिशोब संपला.या दोन दिवसात एकूण शंभर गरजू नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थानी सोडलं होत असे सांगत उदय चितळे यांनी 26 जुलै 2005 च्या एका महाप्रलयकरी पावसाची भयावह कहाणी आणि त्यांनी 100 नागरिकांना कसे सुखरूप घरी पाहचवले हे विषद केले.