Join us

अपघातग्रस्तांच्या हाकेला धावतेय ‘देवदूत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 4:53 AM

मुंबई-पुणे महामार्गावर महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने एकूण चार अग्निशामक व विमोचन वाहने (देवदूत) उपलब्ध करून दिली आहेत.

मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने एकूण चार अग्निशामक व विमोचन वाहने (देवदूत) उपलब्ध करून दिली आहेत. गेल्या दोन वर्षांत या चार वाहनांनी एक्स्प्रेस वेवरच्या ९४.५ किमीच्या पट्ट्यात १६०० हून अधिक अपघात व वाहनांना लागलेल्या आगीच्या वेळी अपघातग्रस्तांना मदत केली आहे. अशा प्रकारची सेवा महाराष्ट्रात प्रत्येक महामार्गावर नक्कीच पुरवायला हवी, जेणेकरून विमोचन आणि प्राथमिक उपचार वेळेवर मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचू शकतील, असे अग्निशमन क्षेत्राचा तीस वर्षांहून अधिक काळ अनुभव असलेले अग्निशमन दलाचे माजी अधिकारी सुभाष कमलाकर राणे यांनी सांगितले.मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन यंत्रणांनी या वाहनांचा आपल्या ताफ्यामध्ये समावेश केला असून, प्रत्येक महामार्गावर अग्निशामक व विमोचन वाहने आवश्यक असल्याचे सांगत राणे म्हणाले की, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने हा स्त्युत्य उपक्रम राबवला आहे. मुंबई-पुणेसारख्या अतिजलद एक्स्प्रेस वेवर अशी त्वरित मदत नेहमीच हवी असते. अपघातग्रस्तांना अशी अतिजलद तत्काळ मदत मिळाल्यास कित्येकांचे प्राण नक्कीच वाचू शकतात. अशा प्रकारचा उपक्रम नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीनेसुद्धा देशभरातल्या महामार्गांवर राबविण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे भयानक आणि आणीबाणीच्या वेळी गरजवंतांना तत्काळ मदत मिळू शकेल. भारतामध्ये सध्या ९६ हजार किमी. लांबीचा महामार्ग आहे. त्यातील ३३ हजार ७०५ किमी. लांबीचा महामार्ग फक्त महाराष्ट्रात आहे. देशात प्रत्येक चार मिनिटांना एक मृत्यू रस्त्यावर झालेल्या अपघातामुळे होतो. ताज्या आकडेवारीनुसार १,२१४ अपघात रोज महामार्गांवर होतात आणि अंदाजे ३७७ प्रवासी दिवसाला मृत्युमुखी पडतात.प्रत्येक महामार्गावर अग्निशमन व विमोचन वाहने आवश्यकअग्निशमन व विमोचन वाहन उपयुक्त असून या वाहनामध्ये आग विझवण्यासाठी वॉटर मिस्ट टेक्नॉलॉजी वापरात असून पाण्याचा कमी वापर व हवेच्या दाबाचा जास्त उपयोग हे तत्त्व वापरले जाते.थंड करणे आणि दडपणे या अग्निशामक विमोचनाच्या प्रकाराचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे तंत्र ही यंत्रणा वापरते. गाडीमध्ये ५०० लीटर पाणी आणि ५० लीटर फोम असून इतर आगीव्यतिरिक्त तेलजन्य व रासायनिक पदार्थांच्या प्राथमिक आगीवर हे तंत्र सहज नियंत्रण मिळवते.याव्यतिरिक्त या वाहनामध्ये विविध प्रकारची कटिंग/ब्रेकिंग टूल्स, श्वसन उपकरणे, एक्स्टिंग्विशर्स, वेगवेगळ्या क्षमतेचे दोरखंड, वाहन खेचण्यासाठी विंचगिअर, रात्री काम करताना प्रकाशयोजनेसाठी लाइट मास्ट अशा गोष्टी आहेत.छोट्या चणीच्या वाहनाच्या आकारावरून या वाहनाच्या ताकदीची कल्पना येत नाही. पण आगीवर प्राथमिक नियंत्रण आणि अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत यांची चांगली सांगड घालून या वाहनांची निर्मिती केलेली आहे. या वाहनावरचा कर्मचारी वर्ग अनुभवी व महाराष्ट्र अग्निशामक सेवा प्रशिक्षणालय, मुंबई येथे प्रशिक्षण घेतलेला आहे.