कोरोनाच्या संकटात प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारे देवदूत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 03:01 PM2020-05-24T15:01:00+5:302020-05-24T15:01:32+5:30
मुंबई शहरासह उपनगरात वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह ज्यांचे कोणी नाही; किंवा ज्यांना कोरोनाच्या संकटात मदत करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. अशा या संकटात त्यांना मदत करण्यासाठी कोविड योध्दा पुढे आले आहेत.
मुंबई : मुंबई शहरासह उपनगरात वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह ज्यांचे कोणी नाही; किंवा ज्यांना कोरोनाच्या संकटात मदत करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. अशा या संकटात त्यांना मदत करण्यासाठी कोविड योध्दा पुढे आले आहेत. यामध्ये समाजातील विविध घटकांचा समावेश असून, दादर येथील शेफ तुषार देशमुख यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय साहित्य आणून देणे, किरणा पोहचता करून देणे यासह रुग्णांना मदत करण्यासाठी देशमुख आपल्या मित्रांसोबत कार्यरत असून, मुंबईकरांनी त्यांना देवदूताची उपमा दिली आहे. शेफ तुषार प्रीती देशमुख आणि त्यांच्यासोबत त्यांची मित्र मंडळी दादरसह मुंबईतल्या शक्य त्या परिसरात कोविड योद्धा म्हणून करत आहेत. यामध्ये प्रीती बटा, जितेंद्र पाटील, अक्षता तेंडुलकर, जतीन देसाई, योगेश म्हात्रे, अंकिता कुलकर्णी, मंदार केळकर, केतकी भागवत, डॉ. अमेय विजयकर, डॉ, हेमंत बैलूर, जी नॉर्थ महानगरपालिका, पोलिस, मेडिकल व किराणा स्टोर्स मालक अशा अनेकांचा यामध्ये समावेश आहे.
आतापर्यंत त्यांनी पेट्रोलपंपावरील तसेच बँकांच्या सुरक्षा रक्षकांना जेवण पुरवले. हिंदू नववर्ष समितीच्या माध्यमातून कार्यकर्ता ह्या नात्याने जेष्ठांसाठीच्या उपक्रमात सहभागी होऊन अनेक आजी-आजोबांना जीवनाआवश्यक वस्तू, औषध, अन्नधान्य व भाजीपाला घरपोच उपलब्ध करून देत आहेत. महानगरपालिकेचे सफाई कामगार, पोलीस, कामगार वर्ग, सोसायटीचे वॉचमन तसेच जे मजूर चालत घरी चालले आहेत, अशांना फुड पॅकेट्स पुरवतात. ज्यांना वेळेवर सिलेंडर मिळत नव्हते अशा गरजुंना आपला मित्र प्रकाश बेलवडे यांच्या मदतीने सिलेंडर उपलब्ध करून दिले. नेत्यांकडून मिळालेले धान्य किट्स, कांदे, मास्क, फेस शिल्ड अनेक गरजू लोकांना दिले. तसेच अनेक सोसायटीमध्ये थेट शेतक-यांकडील भाजीपाला व फळांचे टेंम्पो देखील उपलब्ध करून दिले. रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. अनेक पोलिस व महानगरपालिकेतील गरजूंना योग्य मदतीची सोय करून दिली. रेस्टॉरंटमधील मनातून खचलेल्या १४ कामगारांना दिलासा देऊन चुकीचे पाऊल उचलून पळून जाऊ नये याकरिता त्यांना आधार देऊन राहण्याची व जेवणाची सोय केली. याबाबत तुषार सांगतात की, हे सर्व कार्य शक्य आहे ते माझा मित्र योगेष म्हात्रे. त्याची आई नीना म्हात्रे. वडील दिलीप म्हात्रे. भाऊ कुंदन म्हात्रे व कुटुंबीय यांच्या मुळे, गेली २० वर्षे मी त्यांच्याकडे राहतो आहे. त्यांनी विरोध केला असता तर काहीच शक्य नव्हते. पण त्याचे सहकार्य व पाठबळामुळे आम्ही हे करू शकलो.