Join us

रेशन न मिळाल्याने व्हिडीओ काढल्याचा राग!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 1:17 PM

नगरसेवकाच्या लोकांकडून मारहाण झाल्याचा आरोप; मोबाईलही घेतला हिसकावून

 

मुंबई: नगरसेवक कार्यालयासमोर रेशनसाठी खेपा घालणाऱ्या मजुराला गेल्या तीन ते चार दिवसांपासून धान्य मिळाले नाही. त्यामुळे गुरुवारी त्याने याप्रकाराचा व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल हिसकावत त्याला नगरसेवकाच्या लोकांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे. मात्र असा काही प्रकारच घडला नसल्याचे नगरसेवकाचे म्हणणे आहे.

मालवणीच्या आझमीनगर परिसरात रमझान खान (२२) हा तरुण राहत असुन तो शिंप्याचे काम करतो. संचारबंदीमुळे रोजगार बंद झाला, मात्र सरकारकडून रेशन पुरविले जाईल असे आश्वासन देण्यात आले. काँग्रेसचे नगरसेवक वीरेंद्र चौधरी यांचा हा विभाग असून अनाम उर्दू शाळेच्या कार्यालयासमोर त्यांच्याकडून गरजूना धान्य वाटप केले जात आहे. खान याने 'लोकमत' ला दिलेल्या माहितीनुसार, गेले तीन दिवस तो रेशनसाठी तीन ते चार तास याठिकाणी रांगेत उभा राहत आहे. मात्र त्याला धान्य मिळाले नाही. गुरुवारी सकाळी देखील तो धान्य घेण्यासाठी गेला तेव्हा पुन्हा त्याला चौधरी यांच्या कार्यकर्त्यानी नंतर ये असे सांगितले. त्यावर वैतागलेल्या खानने खिशातून मोबाईल काढत त्याठिकाणचे शुटींग करण्यास सुरुवात केली. मात्र त्याला तितक्यात एका कार्यकर्त्याने येऊन त्याचा मोबाईल हिसकावला आणि त्याच्या कानशिलात मारण्यास सुरवात केली. त्याच्यावर रॉडने हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या या कार्यकर्त्याला अन्य लोकांनी रोखले. अन्यथा अन्नासाठी खान याच्या जीवावर बेतले असते. त्यानंतर स्थानिक युवा एकता संस्थेचे नदीम यांनी हे प्रकरण शांत केले मात्र त्यानंतर देखील त्या कार्यकर्त्याने कडीया काम करणारा खानचा मोठा भाऊ आसिफ याची कॉलर पकडून त्याला धमकावले, असे खानचे म्हणणे आहे. त्यामुळे या कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन जीव गमावण्यापेक्षा उपाशी राहिलेले परवडले अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

याबाबत लोकमत प्रतिनिधीने चौधरी यांना संपर्क केला असता त्यांनी या सगळ्या प्रकाराचा इन्कार केला असून आमच्याकडे असे काही घडलेच नसल्याचा दावा केला आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या विभागात हा प्रकार घडल्याने त्यांनीही यात लक्ष घालण्याची विनंती स्थानिकांकडून करण्यात आली आहे.

टॅग्स :अन्नमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई