राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजेंबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजकडून निषेध नोंदवण्यात येत आहे. आता, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही औरंगजेबाबद्दल केलेल्या विधानाविरुद्ध भाजपसह मराठा संघटना आक्रमक झाल्याचा पाहायाला मिळालं. मराठा समाजातर्फे चेंबूर येथे अजित पवार, जितेंद्र आव्हाड आणि इतर नेत्यांविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी निषेधाची घोषणाबाजी करत दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेला काळं फासण्यात आलं. तसेच, पुतळ्याला जोडेमारो आंदोलनही करण्यात आले.
छत्रपती संभाजी राजे यांच्याबद्दल चुकीच्या वक्तव्य केल्याच्या निषेधार्ह चेंबुरमध्ये मराठा समाजातील विभिन्न संघटनांनी एकत्र येत चेंबूर पंझरपोल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अजित पवार, जितेंद्र आव्हाड आणि इतर नेत्यांच्या विरोधात जाहीर निषेध आंदोलन केले. अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध म्हणून त्यांचा फोटो फाडून पायाखाली टाकण्यात आला. तसेच यापुढे असा प्रकार झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
मराठा युवा सेनेचे अध्यक्ष अंकुश कदम, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अविनाश राणे,अनिता महाडिक, महिला जिलाध्यक्ष, मोहन पवार, जिल्हा सरचिटणीस, तालुका अध्यक्ष वैशाली कदम, तालुका युवक अध्यक्ष चेतन ढमाले, शाखाध्यक्ष किशोर घाग, किशोरी कडू, महिला शाखाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलन करण्यात आला.
पनवेलमध्येही निषेध आंदोलन
अजित पवार यांनी केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत वक्तव्याप्रकरणी राज्य भरात भाजप निषेध व्यक्त करत असताना,आज पनवेल भाजप च्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले, या अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर त्यांच्या फोटोवर फुल्ली मारण्यात आली,तर अजित पवार यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून,त्यांच्यावर टीका केली.यावेळी भाजपचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.