एकाला अटक, साथीदारांचा शोध सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मित्रांसोबत वाद घालत असताना पहिल्याच्या रागात अहमद सिराजुद्दीन अन्सारी (४२) या बेकरी चालकाला शुक्रवारी रात्री बेदम मारहाण करण्यात आली. हा सगळा प्रकार त्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणीने शूट करत मुंबई पोलिसांना ट्विट केला. त्यानुसार, समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, एकाला अटक केली, तर अन्य हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
अन्सारी हे कांदिवली पूर्वच्या हनुमाननगर येथे राहतात. साडेसातच्या सुमारास ते आकुर्ली रोड गुंडेचा इंडस्ट्रियल गेट जवळच्या तनिष्क बिल्डिंगसमोर वडापावच्या गाडीवर आम्लेट खात उभे होते. त्याच वेळी मुख्य हल्लेखोर प्रकाश शर्मा हा त्याच्या साथीदारासोबत वाद घालत होता. त्यांचा आवाज वाढल्याने अन्सारी यांनी त्यांच्याकडे पाहिले. त्याचा शर्मा व त्याच्या साथीदाराला राग येऊन त्यांनी अन्सारी यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली, तसेच शर्माने त्याच्या हातातील स्टीलचा कड्याने अन्सारी यांच्या डोक्यात फटका मारून त्यांना गंभीर दुखापत केली. त्यांच्या मदतीकरिता इम्तियाज अन्सारी व इंतजार अन्सारी हे धावून गेले. तेव्हा शर्माने इम्तियाज यांच्या डोक्यावरही हातातील कड्याने फटका मारला. हा सगळा प्रकार एका तरुणीने ट्विट केल्यानंतर, समतानगर पोलिसांनी उमेश शिवाजी गायकवाड (२०) याला अटक केली, तर मुख्य हल्लेखोर शर्मा व त्याच्या पसार साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनाही लवकरच गजाआड करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू कसबे यांनी सांगितले.