Join us

सावरकरांच्या मुद्द्यावरुन सभागृहात संताप, मुख्यमंत्री शिंदेंचा राहुल गांधींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 6:13 PM

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर निशाणा साधला

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरतच्या कोर्टाने २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी त्यांना तात्काळ जामीनही मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयानंतर शुक्रवारी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले. त्यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज सदस्यत्व रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी, माफी मागायला माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे, असे म्हणत राहुल गांधींनी पुन्हा एकदा सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजपला डिवचलंय. त्यावरुन, आता भाजप नेत पलटवार करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर पलटवार केलाय. 

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर निशाणा साधला. स्पीकरने बोलण्याची संधी दिली नाही, असा आरोप त्यांनी केला. मोदी आडनावावरुन माफी संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, 'मी कोणाला घाबरत नाही. मी गांधी आहे, सावरकर नाही'. त्यावरुन, आता भाजप नेते आक्रमक झाले असून राहुल गांधींवर पलटवार करण्यात येत आहे. विधानसभा सभागृहातही या मुद्द्यावरुन रणकंदन झाल्याचं पाहायला मिळालं. 

विधानभवन परिसरात राहुल गांधी यांच्या बॅनरवरील फोटोला चपला, जोड्यांनी मारहाण करण्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडला. अशा प्रकराचे विकृत प्रकार होणे पुर्णपणे चुकीचे, निंदनीय व लोकशाहीस मारक आहे. अशा प्रकारचे गैरवर्तन आपल्या कार्यकाळात झाले असून विधानसभा अध्यक्षांसाठीही हे योग्य नाही. या घटनेबाबत दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केली  होती. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला. 

''सावरकरांचा वारंवार अपमान राहुल गांधींनी केला आहे. आजही त्यांनी सावरकरांचा अपमान केला. सावरकर हे फक्त महाराष्ट्राचे नाही, तर देशाचे दैवत आहेत. त्यांनी देशासाठी मरणयातना भोगल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसल्या आहेत. राहुल गांधी यांनी फक्त एक दिवस सेल्युलर तुरुंगात राहून यावं, फक्त एक तास घाण्याला झुंपलं तर त्यांना त्या यातना कळतील. म्हणून याचा निषेध करावं तितकं कमी आहे.'', असे म्हणत एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींच्या विधानावर पलटवार केला. 

अदानींना २० हजार कोटी रुपये कोणी दिले?

'मी फक्त एकच प्रश्न विचारला. अदानीजींचा पायाभूत सुविधांचा व्यवसाय आहे पण पैसा त्यांचा नाही. मला फक्त हे २०,००० कोटी रुपये कोणाचे आहेत हे जाणून घ्यायचे होते. मी मीडिया रिपोर्ट्समधून माहिती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे नाते नवीन नाही. ते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून हे नाते सुरू आहे. मी लोकसभेत विमानात बसलेल्या नरेंद्र मोदी आणि अदानी यांचा फोटो दाखवला. ते माझे भाषण डिलीट करण्यात आले. मी या प्रकरणी अध्यक्षांना पत्र लिहिले आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :राहुल गांधीएकनाथ शिंदेविनायक दामोदर सावरकर