मुंबई - गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळत आहे. चंद्रकांत पाटील यांना झोपेत सरकार पडणार अशी स्वप्ने दिसत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर, अजित पवारांनी जपून भाषा वापरावी, अशी सूचना पाटील यांनी केली होती. आता, अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील वादावर स्वत: पाटील यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. आमचा रागा अजित दादांवर नसून दगा देणाऱ्या शिवसेनेवर असल्याचं पाटील यांनी म्हटलंय.
अजित पवार आणि माझा काही बांधाला बांध नाही. त्यांचे आणि माझे वैयक्तिक वाद नाही. पण, ते जेव्हा माझ्या पक्षाबद्दल बोलतात तेव्हा मी उत्तर देणार. अजित पवार जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत बोलतात, आमच्या संस्थांबाबत बोलतात तेव्हा त्यांना उत्तर देणं भाग आहे. माझा आणि देवेंद्रजींचा राग सरकार पडलं म्हणून अजित पवारांवर नाही. शिवसेनेनं दगा दिल्यामुळे शिवसेनेवर आहे, असही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. अजित दादा आणि चंद्रकांत दादा यात मोठे दादा कोण हे समाज ठरवेल, असंही ते म्हणाले.
खडसेंनाही लगावला टोला
काही महिन्यांपूर्वी भाजपला रामराम ठोकत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पण त्याआधी आणि राष्ट्रवादी प्रवेशानंतर संधी मिळेल तेव्हा खडसे यांच्याकडून भाजपच्या नेत्यांवर टीकास्र सोडणे सुरूच आहे. आताही त्यांनी भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचे मत व्यक्त केले होते. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना 'नाथाभाऊ आमचे नेते, त्यांनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं' अशा शब्दात जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
आघाडी सरकारला टोला
आघाडी सरकारमध्ये कोणत्याही गोष्टीवर एकवाक्यता नाही. आणि प्रत्येकाला प्रेस समोर येण्याची घाई झाली आहे असे म्हणत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नाही अशी टीकाही केली.
संजय राऊतांनी २८० जागा लढवाव्यात..
संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच ८० जागा लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. पण, त्यांनी ८० नव्हे २८० जागा लढवाव्यात. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी शिवसेना नेते राऊत यांना चिमटा काढला. राऊत यांचं नाव घेऊन तुम्ही माझा दिवस का बिघडवता आहात? असा प्रश्नदेखील पाटील यांनी विचारला.
इंधन दरवाढ विरुद्ध आंदोलनावर टीका
उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना प्रत्येक गोष्ट केंद्राने करावी असे वाटत असते. मात्र, राज्याने आधी १० रुपये इंधनावरचा कर कमी करावा, मग केंद्राकडे ५ रुपये कर कमी करण्याची मागणी करावी असे मत व्यक्त करतानाच काँग्रेसच्या इंधन दरवाढ विरुद्ध आंदोलनावर टीका केली.