पाच रुपये कमिशन घेतल्याच्या रागात विवस्त्र करून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 01:28 AM2019-07-01T01:28:01+5:302019-07-01T01:28:25+5:30

हल्ल्यात जोगेश्वरीचे रहिवासी असलेले इम्रान अन्सारी (४०) गंभीर जखमी झाले आहेत.

 In the anger of taking a five-rupee commission, | पाच रुपये कमिशन घेतल्याच्या रागात विवस्त्र करून मारहाण

पाच रुपये कमिशन घेतल्याच्या रागात विवस्त्र करून मारहाण

Next

मुंबई : दुसऱ्या टेलरकडून एका कपड्यामागे ५ रुपयांचे कमिशन घेतल्याच्या रागात दुकानातील टेलरसह व्यवस्थापकाला विवस्त्र करून लाथा-बुक्क्यांसह, लोखंडी रॉड, बेल्टने मारहाण केल्याचा प्रकार दिंडोशी परिसरात उघडकीस आला आहे. आरोपीने दोघांनाही पोलीस ठाण्यात नेत असल्याचे सांगून जोगेश्वरीच्या एका कारखान्यात डांबले. तेथे असलेल्या ९ जणांनी त्यांच्या डोक्यात सिगारेटचे चटके देत, सव्वा लाख रुपयांची मागणी केली. अखेर, ९ तासांच्या मारहाणीनंतर घरी पैशांसाठी फोन जाताच, भाऊ पोलिसांना घेऊन तेथे धडकल्याने दोघांची सुटका झाल्याची घटना दिंडोशीत घडली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
या हल्ल्यात जोगेश्वरीचे रहिवासी असलेले इम्रान अन्सारी (४०) गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कलरफुल क्रिएशनचा मालक मुकेश गडा याच्यासह त्याचे साथीदार हितेश गडा, जिनेश गडा, जयेश गडा व अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्सारी हे गेल्या वर्षभरापासून मुकेशच्या दुकानात टेलरिंगचे काम करायचे. मुकेश आणखी कारागिराच्या शोधात असताना, अन्सारी आणि व्यवस्थापक निरव गाला यांनी अहमद शेखची मुकेशसोबत भेट करून दिली. ठरल्यानुसार, ५५ रुपयांत एक टॉप शिवून देण्याच्या व्यवहारावर अहमदला कामावर ठेवण्यात आले. याच दरम्यान अन्सारी आणि निरवने एका टॉपमागे ५ रुपये कमिशन घेतले. २८ जून रोजी ही बाब मुकेशला समजताच त्याने याबाबत अन्सारीकडे विचारणा केली. त्यानेही याबाबत कबुली दिली. २९ जून रोजी त्याने अहमदला दुकानात बोलावून याबाबत शहानिशा करून त्याला पाठवून
दिले. याच रागात दुपारी पावणेदोनच्या सुमारास अन्सारी आणि गाला याला कार्यालयात बोलावून विवस्त्र करून लाथा-बुक्क्यांसह बेल्ट, लोखंडी रॉड, लाकडी बांबूने मारहाण सुरू केली.
त्यांनी अनेकदा माफी मागूनदेखील मुकेश आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण सुरूच ठेवली. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास दोघांना जोगेश्वरी पोलीस ठाण्यात नेतो असे सांगून, मर्सिडीजमधून जोगेश्वरीच्या एका कारखान्यात नेले. तेथे त्याचे आणखीन ८ साथीदार तळ ठोकून होते. आठही जणांनी दोघांना मारहाण सुरू केली.

भावाच्या सतर्कतेमुळे सुटका
रात्री पावणेदहाच्या सुमारास अन्सारीच्या विनंतीनंतर, मुकेशने त्याच्या भावाला फोन लावून पैसे आणून देण्यास सांगितले. भावाने थेट अंबोली पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांसह कारखान्यात प्रवेश केल्याने सुटका झाल्याचे अन्सारीने सांगितले. हे प्रकरण दिंडोशी पोलिसांच्या हद्दीत असल्याने अन्सारीच्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी ही कारवाई केली.

सिगारेटचे चटके
आठही जणांनी सिगारेट ओढत नसतानाही जबरदस्तीने दोघांना सिगारेट ओढण्यास सांगून डोळ्यातून धूर काढण्यास सांगितला. त्यानंतर, त्याच सिगारेटने डोक्यावरचे केस जाळून चटके दिले. पाण्याची मागणी करताच, जेवढे पाणी पिणार तेवढे रक्त काढणार असे सांगून बेल्टने मारहाण केली.

Web Title:  In the anger of taking a five-rupee commission,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.