मुंबई - पुण्यातील दिवंगत भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधानामुळे रिक्त झालेल्या जागेवर आता खुद्द अजित पवार यांनीच दावा केला आहे. आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेसकडे असूनही पवार यांनी त्यावर राष्ट्रवादीचा दावा केला आहे. तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत हा जागा सोडणार नसल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. शिवसेना नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुण्यातील पोटनिवडणुकीच्या जागेसंदर्भात स्पष्टपणे सांगितले. तर, दिल्लीतील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करताना, सावित्रीबाई फुलेंचा पुतळा हटवल्यावरुन त्यांनी संताप व्यक्त केला.
पुण्यातील लोकसभा पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. य़ाच दरम्यान यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. "संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल" असं राऊत यांनी म्हटलं. तर, अंबादास दानवे यांनीही यावर भाष्य केलंय. पुण्याच्या जागेसंदर्भात तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते चर्चा करतील. महाविकास आघाडी ती जागा निवडून आणण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्रित निर्णय घेतील. कोणताही पक्ष जागा लढवण्यासाठी प्रयत्न करत असतो, असे म्हणत अंबादास दानवे यांनी या जागेचा निर्णय वरिष्ठच घेतील, असे स्पष्ट केले. तर, संभाजीराजे निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी ते करावेत, असेही ते म्हणाले.
पुण्यातील जागेसंदर्भात संजय राऊत म्हणाले
"कसेल त्याची जमीन या प्रमाणे... जो जिंकेल त्याची जागा. हे सूत्र ठरले तर "कसबा" प्रमाणे पुणे "लोकसभा" पोट निवडणुक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल! जय महाराष्ट्र!" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ही कोत्या मनाची लोकं
सावरकरांना अभिवादन करताना अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा असता तर काय बिघडलं असतं. अशाप्रकारे पुतळे हटवण्याचं काम होत असेल तर ही कोत्या मनोवृत्तीची लोक आहेत, अशा शब्दात अंबदास दानवे यांनी भाजपा-शिवसेना शिंदे गटावर टीका केलीय.