मुंबई : वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून डी. के. जैन यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती केल्याचे पडसाद उमटू लागले आहेत. जैन यांना बढती मिळाल्यामुळे डावलले गेलेल्या अधिकाºयांमध्ये नाराजी आहे. त्यातूनच राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सुधीर श्रीवास्तव दीर्घ रजेवर गेल्याचे समजते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन यांना मुख्य सचिवपदी बढती देण्याचा निर्णय डिसेंबर महिन्यातच घेण्यात आला होता. तत्कालीन मुख्य सचिव सुमित मलिक यांनी स्वेच्छानिवृत्ती घ्यावी. त्यानंतर मलिक यांचे मुख्य माहिती आयुक्तपदी पुनर्वसन करून राज्याचे मुख्य सचिवपद डी.के. जैन यांना सोपवावे. मात्र, दरम्यानच्या काळात कोरेगाव भीमा हिंसाचाराची घटना घडली. या घटनेमुळे राज्यातील जातीय भावना तीव्र झाल्याने वातावरण गंभीर बनल्याने मलिक यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा विषय मागे पडला. त्या वेळीच वरिष्ठ सनदी अधिकाºयांनी जैन यांची संभाव्य बढती रोखण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मन वळविण्याचे प्रयत्नही झाले. मात्र, जैन यांच्या हाती कारभार सोपविण्याबाबत मुख्यमंत्री ठाम राहिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.शासकीय सुट्टीच्या दिवशी जैन यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती. याबाबतही तर्क लढविण्यात येत आहेत. आठवड्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी जैन यांच्या नावाची घोषणा केल्यास त्याला आव्हान देण्यास नाराज अधिकाºयांना पुरेसा अवधी मिळू शकतो. या भीतीपोटीच सुट्टीच्या दिवशी नियुक्तीची घोषणा झाली; आणि जैन यांनीही तातडीने पदभार स्वीकारला. जैन यांच्याकडे मुख्य सचिव पद जाणार असल्याची खात्री होताच श्रीवास्तव शुक्रवारपासूनच दीर्घ रजेवर गेल्याचे समजते. त्यांचे घर बंद असून त्यांचा मोबाइलही स्वीच आॅफ असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.अतिरिक्त मुख्य सचिव (मदत व पुनर्वसन) मेधा गाडगीळ, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सुधीर श्रीवास्तव आदी वरिष्ठ अधिकाºयांना डावलून जैन यांची नियुक्ती झाली आहे. सरकारने पुरेशी दक्षता घेत त्यांची नियुक्ती केली असली तरी त्याला केंद्रीय प्रशासकीय लवाद (कॅट)मध्ये आव्हान देण्याबाबत संबंधित अधिकाºयांकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सेवाज्येष्ठतेनुसार मेधा गाडगीळ यांना पसंती दिली असती तर राज्याला प्रथमच महिला अधिकारी मुख्य सचिव म्हणून लाभल्या असत्या. त्या मराठी असल्यानेही त्यांना संधी द्यावी, अशी मागणीही समोर येत होती. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये केलेले कार्य, शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतील त्यांचा हातखंडा पाहून जैन यांना संधी देण्यात आली.
सेवाज्येष्ठता डावलल्याने नाराज श्रीवास्तव रजेवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 6:41 AM