मुंबई : माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन मुंबईत गणेश दर्शनाकरिता आले असताना त्यांना अस्वस्थ वाटल्याने मंगळवारी दुपारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर काही हृदयविकाराशी संबंधित काही चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये त्यांच्या हृदयाच्या एक रक्तवाहिनीत ब्लॉक आढळल्याचे दिसून आले. त्यावर रुग्णलायतील हृदयविकार तज्ज्ञ डॉ सुरेश विजन यांनी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मंगळवारी दुपारी ज्यावेळी हुसेन यांना अस्वस्थ वाटल्याचे जाणवले त्यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार त्यांनी तात्काळ त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. त्यांना श्वसनविकार तज्ज्ञ डॉ जलील पारकर यांच्याकडे दाखल करण्यात आले. डॉ पारकर यांनी सर्व शक्यता तपासण्यासाठी काही चाचण्या केल्या. त्यावेळी इ सी जी मध्ये त्यांना काही बदल जाणवले. त्यांनी तात्काळ त्यावेळी रुग्णालयात उपस्थित असणारे हृदयविकार तज्ज्ञ डॉ सुरेश विजन यांच्याकडून अँजिओग्राफी करून घेतली, त्यावेळी त्यांना एक ब्लॉक आढळून आला. त्यावेळी त्यांनी अँजिओप्लास्टी करून त्या ठिकाणी स्टेण्ट बसविला.