लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मुंबईतील लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी सर्जरी पार पडली. वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात राऊत बुधवारी दाखल झाले होते. त्यानंतर गुरुवारी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पार पडली. ती यशस्वी झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून कळवण्यात आले. त्यानंतर सध्या संजय राऊत यांना अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मात्र आता त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांनी परत अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्या हृदयात दोन स्टेंट घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी स्टेंट टाकावे लागणार होते. त्यासाठी एप्रिल २०२० ही नियोजित वेळ होती, पण कोरोना प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.
लीलावती रुग्णालयातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मॅथ्यू यांनी राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया केली. डॉ. मॅथ्यू आणि डॉ. अजित मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली, संजय राऊत यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.