लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इन्स्टाग्रामवर फेक अकाउंटवर क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतविल्यास अर्ध्या तासात दुप्पट करून देतो, अशी जाहिरात देऊन लोकांना गंडा घालणाऱ्या आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे. मोहम्मद हमजा झाकी अन्वर (२१) असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भामट्यांनी इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून त्या माध्यमातून क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतविल्यास ते ३० ते ३५ मिनिटांमध्ये दुप्पट करून देतो, अशी जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीला भुललेल्या अनेक लोकांनी ऑनलाइन पद्धतीने पैसे गुंतवले. मात्र त्यातून अनेकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
दरम्यान २३ जून रोजी अशाच एका प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदाराला भामट्यांनी ७५ हजार रुपयांचा चुना लावल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार काळाचौकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद भोवते आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुदर्शन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राम तुपे व पथक यांनी सदर गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपास करून ते इन्स्टाग्राम अकाउंट कोणत्या मोबाइलधारकाने तयार केले ते शोधून काढले.
पोलिस अधिका-यांनी त्या मोबाइल क्रमांकाची अधिक माहिती मिळवली असता तो नंबर मोहम्मद हमजा झाकी अन्वर याचा असून तो कोलकाताचा रहिवासी असल्याचे उघड झाले. त्यानुसार तुपे व पथक यांनी पश्चिम बंगालला आरोपीच्या राहत्या घरून त्याला अटक केली. त्या गुन्ह्यासाठी त्याने जवळपास ११ वेगवेगळे सीम कार्ड आणि मोबाइलचा वापर केल्याचे तपासात उघड झाले. या रॅकेटमध्ये आरोपीव्यतिरिक्त कुठली टोळी सहभागी आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत.
आरोपी अन्वर याने इन्स्टाग्रामवर असलेल्या नामांकित एन्फ्लूएन्सरमार्फत पेड प्रमोशन केल्याचेही तपासून झाले असून त्यानुसार पोलिसांनी काहींना नोटीस पाठवल्याची माहिती आहे. या व्यक्तींनी त्यांनी केलेला गुंतवणुकीवर झटपट आर्थिक लाभ झाल्याचे पोस्ट केल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.