मुंबई : कालिकत ते बहारीन प्रवासादरम्यान एका प्रवाशाने विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याने धांदल उडाली. या प्रवाशाने विमान कर्मचारी आणि प्रवाशांना शिवीगाळ करत गोंधळ घातल्याने विमान मार्ग बदलून मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले. शनिवारी दुपारी १२:५२ दरम्यान कालिकतहून बहारीनला निघालेले विमान मुंबईकडे वळविण्यात येणार असल्याचा संदेश मिळताच यंत्रणा सज्ज झाल्या. विमानाला मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले.
गोंधळ घालणारा प्रवासी अब्दुल मुसावीर नाडुकंडीईल (२५) याला सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्यानंतर, विमान बाहरीनला रवाना झाले. एअर इंडिया एक्स्प्रेस लिमिटेड कंपनीचे सुरक्षा कर्मचारी ओम रमेश देशमुख यांच्या तक्रारीनुसार सहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुलचा पासपोर्ट तपासाला असता तो मूळचा केरळचा रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे.
घटनाक्रम... बहारीनला निघालेल्या या विमानाने सकाळी १०:१० वाजता कालिकत विमानतळावरून उड्डाण केले. दुपारी १२ च्या सुमारास अब्दुल हा प्रवासी विमानाच्या मागच्या बाजूच्या दरवाजाजवळ गेला. तेथील विमान कर्मचाऱ्याला धक्का मारून त्याने विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने गोंधळ घातला. अन्य प्रवाशांनाही शिवीगाळ, धक्काबुकी केली. या प्रकारामुळे अन्य प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पायलटने विमान मुंबईला उतरवले.