नाराज कार्यकर्ते निघाले गावाला...
By Admin | Published: February 15, 2017 05:05 AM2017-02-15T05:05:39+5:302017-02-15T05:05:39+5:30
निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून, नवख्या, तसेच अन्य पक्षांतून आलेल्या उमेदवारांना संधी दिल्यामुळे उत्तर पूर्व मुंबईतील भाजपा कार्यकर्ते
मुंबई : निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून, नवख्या, तसेच अन्य पक्षांतून आलेल्या उमेदवारांना संधी दिल्यामुळे उत्तर पूर्व मुंबईतील भाजपा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची अंतर्गत धुसफुस वाढत आहे. मात्र, वरिष्ठांच्या आदेशाने संबंधित उमेदवारासोबत फिरणे बंधनकारक असल्याने, अनेक जण विविध कारणे देत गावाला निघाल्याचे चित्र मुलुंड, भांडुप, विक्रोळी आणि घाटकोपर परिसरात दिसत आहे.
‘अहो गावी आई आजारी आहे’... ‘नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात आहे’.. तर काही जण तर चक्क ‘शेतजमिनीवरून वाद सुरू असल्याची’ नानाविध कारणे पुढे करून भाजपाचे कार्यकर्ते गावी रवाना झाले आहेत. ऐन निवडणुकांच्या तोंडावर कार्यकर्त्यांच्या गावदौऱ्यामुळे भाजपा उमेदवारही चक्रावले आहेत. मात्र, बोलायचे तरी कोणाला, अशी कोंडी नवख्या उमेदवारांची झाली आहे. गावी निघालेल्या बहुतांश कार्यकत्यांच्या त्या प्रभागात चांगली पकड आहे. त्यामुळे आपला प्रचार करायचा तरी कसा, असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे.
मुलुंडमध्ये आपल्या एकाही उमेदवाराला संधी न दिल्यामुळे, आमदार सरदार तारासिंग यांनी भाजपा उमेदवारांच्या प्रचाराला न उतरण्याचा हट्ट धरला होता. उमेदवारी अर्ज भरतेवेळीदेखील ते गैरहजर होते. मात्र, ही बाब वरिष्ठांना समजताच वरिष्ठांकडून त्यांना उमेदवारांसोबत उतरण्याची तंबी दिल्याने ते प्रचाराला उतरताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)