Join us  

संतप्त प्रवाशाने फोडले ‘बेस्ट’ वाहकाचे डोके; गोरेगावच्या शास्त्रीनगर परिसरातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 6:08 AM

बसमध्ये पुढच्या बाजूने चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रवाशाला चालकाने आणि वाहकाने अडवले.

मुंबई :

बेस्ट बसमध्ये वाहक, चालकांचे प्रवाशांसोबत होत असलेले लहानमोठे वाद काही नवीन नाहीत. गोरेगावच्या शास्त्रीनगर परिसरातही असाच एक प्रकार शुक्रवारी  घडला. बसमध्ये पुढच्या बाजूने चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रवाशाला चालकाने आणि वाहकाने अडवले. त्यामुळे राग येऊन त्याने वाहकाचे डोकेच फोडले. याप्रकरणी अनमोल सिंग ( २०) याला ताब्यात घेण्यात आले आहे. 

जखमी वाहकाचे नाव जालिंदर आढाव (३३) असे असून, ते जोगेश्वरीचे राहणारे आहेत. आढाव यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ते कर्तव्यावर हजर झाले. त्यानुसार त्यांना आणि चालक महेश बसवंत (४२) यांना बेस्ट रूट क्रमांक ७०७ या गोरेगाव बस डेपो ते भाईंदर स्थानक येथे ड्युटीवर पाठवण्यात आले. 

ही बस ८ वाजता शास्त्रीनगर बस स्टॉपवर थांबली. यावेळी सिंग हा बसच्या पुढच्या दरवाजातून चढत असताना बसवंत यांनी त्याला मागच्या दरवाजातून चढा असे सांगितले. त्यावर त्याने बसवंत यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात करत तो जबरदस्ती पुढच्या दरवाजाने बसमध्ये चढू लागला. त्यानंतर वाहक आढाव यांनी त्याला खाली उतरवले. त्यामुळे चिडून अनमोल सिंगने त्यांच्याशी पुन्हा वाद घालत आणि शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली. 

रस्त्यावर पडलेला बांबू उचलून डोक्यात घातलाआढाव बसमध्ये चढत असताना रस्त्यावर पडलेला बांबू उचलून त्यांच्या डोक्यात मारला. यात त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्त येऊ लागले आणि ते जमिनीवर कोसळले. ते पाहून सिंग तिथून पळून जाऊ लागला. मात्र, स्थानिकांनी त्याला पकडत पोलिसांना फोन केला. त्यानुसार बांगूरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सिंगला ताब्यात घेतले, तर आढाव यांना उपचारासाठी जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून दोन टाके घालण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी बांगूरनगर पोलिसात जाऊन सिंगच्या विरोधात तक्रार केली.

टॅग्स :बेस्ट