नाराज शिवसेना कार्यकर्त्यांकडून ‘पोस्टरबाजी’?

By Admin | Published: February 1, 2017 12:58 AM2017-02-01T00:58:21+5:302017-02-01T00:58:21+5:30

प्रतिष्ठा पणाला लागल्याने कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचाच, असा निश्चय केलेल्या शिवसेनेने जुन्या-जाणत्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना

Angry posters' Shiv Sena workers? | नाराज शिवसेना कार्यकर्त्यांकडून ‘पोस्टरबाजी’?

नाराज शिवसेना कार्यकर्त्यांकडून ‘पोस्टरबाजी’?

Next

मुंबई : प्रतिष्ठा पणाला लागल्याने कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचाच, असा निश्चय केलेल्या शिवसेनेने जुन्या-जाणत्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना बाजूला सारत अन्य पक्षांच्या प्रभावी कार्यकर्त्यांना तिकीट देण्यात स्वारस्य दाखवल्याची जोरदार चर्चा एन वॉर्डात आहे. त्यामुळे दुखावलेले पदाधिकारी व कार्यकर्ते बंडखोरीवर उतरण्याची शक्यता असल्याचे एन वॉर्डात दिसून आले. अन्य पक्षांतून आलेले उमेदवार शिवसेनेत तिकीट मिळवण्यास इच्छुक असल्याने त्याचा निषेध म्हणून ‘नाराज कार्यकर्त्यां’कडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
युती तुटल्यानंतर मुंबई महापालिकेवर स्वत:चा झेंडा फडकवण्यासाठी भाजपा व शिवसेना एकमेकांचे व प्रसंगी काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रभावी उमेदवार खेचण्याच्या प्रयत्नात आहेत. शिवसेनेने तर संबंधित प्रभागात कोणता समाज बहुसंख्य आहे, याची चाचपणी करून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या सेनेच्याच बड्या पदाधिकाऱ्यांना बाजूला करत अन्य पक्षांच्या उमेदवारांना तिकीट देण्याचे आश्वासन देत गळाला लावले आहे. याचेच ताजे उदाहरण म्हणजे एन वॉर्डमधील भाजपाचे माजी नगरसेवक मंगल भानुशाली. भानुशाली यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना सेनेकडून तिकीट देण्यात आले. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी पंतनगर येथे त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. तर दुसरीकडे हारुन खानही सेनेत प्रवेश करण्याची चर्चा रंगल्याने अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना जाब विचारणारे पोस्टर लावण्यात आले आहे.
एन वॉर्डच्या १३१ प्रभागात गुजराती समाज बहुसंख्य असल्याने सेनेने भाजपाच्या मंगल भानुशाली यांना सेनेत प्रवेश देत तिकीट दिले. तर नव्या १२४ प्रभागावर राष्ट्रवादी काँग्रेसचे हारुन खान यांची गेली १० वर्षे सत्ता असल्याने सेनेने त्यांच्यापुढेही प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे. यामुळे संतप्त शिवसैनिकांनी पोस्टर लावून सेनेच्या नेत्यांना सवाल केला आहे. ‘दोन विभागप्रमुखांना मारहाण आणि अनधिकृत बांधकामांचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या हारुन खानला निवडून देणार का?’ असा सवाल पोस्टरद्वारे उपस्थित केला आहे. एन वॉर्डमध्ये सेनेला निवडणुकीच्या रिंगणात भाजपाच्या उमेदवाराच्या आव्हानापेक्षा आधी बंडखोरांच्या दबावाला सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)

अनेक पक्षांद्वारे ‘आॅफर’ आल्या : हारुन खान
नव्या १२४ प्रभागात गेली १० वर्षे हारून खान निवडून येत असल्याने व याच प्रभागात मुस्लीम समाज बहुसंख्य असल्याने सेनेने हारुन खान यांच्यापुढे प्रस्ताव ठेवल्याची चर्चा एन वॉर्डमध्ये रंगली आहे. मात्र यासंदर्भात खान यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट नकार दिला. केवळ शिवसेनाच नाही, तर भाजपा, काँग्रेसकडूनही अशी आॅफर आल्याचे खान यांनी सांगितले. मात्र आपण राष्ट्रवादीकडूनच उभे राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Angry posters' Shiv Sena workers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.