संतप्त शिक्षकांनी पालिकेच्या द्वारावरच फेकला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:07 AM2021-01-21T04:07:09+5:302021-01-21T04:07:09+5:30

मालवणीतील प्रकार : तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने शिक्षक संतप्त लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मालवणी परिसरात कचऱ्याच्या वाढत्या साम्राज्याने शाळांनाही ...

Angry teachers threw garbage at the door of the municipality | संतप्त शिक्षकांनी पालिकेच्या द्वारावरच फेकला कचरा

संतप्त शिक्षकांनी पालिकेच्या द्वारावरच फेकला कचरा

Next

मालवणीतील प्रकार : तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने शिक्षक संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालवणी परिसरात कचऱ्याच्या वाढत्या साम्राज्याने शाळांनाही विळखा घातला आहे. याविरोधात घनकचरा विभागाला वारंवार तक्रार करूनदेखील दुर्लक्ष करण्यात आल्याने संतप्त शिक्षकांनी थेट पी उत्तर कार्यालयासमोर आणून कचरा फेकत बुधवारी निषेध व्यक्त केला.

मालवणीतील शिक्षकांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, पी उत्तर विभागातील घनकचरा विभागाला शाळा परिसरातील कचरा वेळोवेळी उचलण्यासाठी वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, असे असूनही याकडे दुर्लक्ष केले जात होते. मालवणी विभागात घाणीचे साम्राज्य आहे. विभागातील अनेक शाळांच्या गेटला मनपाने कचरा संकलन केंद्र बनविले आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही स्थानिक घनकचरा विभागातर्फे कोणताही कायमस्वरूपी मार्ग काढला जात नाही.

आम्ही दररोज एक हजार किलो ओला कचरा आमच्या खतनिर्मिती प्रकल्पात द्यावा, अशी विनंती केली. पण, त्यालाही विभाग सहकार्य करत नाही. परिणामी, तुमचा खाऊ तुम्हाला परत देऊ, असा त्यांना इशारा देत अखेर आम्ही कचरा पी उत्तरच्या गेटवर फेकला, असे शिक्षकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे मुंबईचे पालकमंत्री तसेच स्थानिक आमदार अस्लम शेख हे त्यांचा विभाग असलेल्या मालवणी विभागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित या मुद्द्यावर ते कोणते पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आम्ही २४ तास कचऱ्यात राहतो !

पी उत्तरच्या गेटवर फेकलेला कचरा त्यांनी अवघ्या तासाभरात गाडीत भरून त्याची विल्हेवाट लावली. पालिकेचे अधिकारी व कर्मचारी तासभर हे सहन करू शकत नाही. मात्र, त्यांच्या हलगर्जीपणामुळे आम्ही २४ तास त्याच कचऱ्यात कोणत्या परिस्थितीत राहतो, याचा अंदाज पालिकेला आला असावा, अशी मी आशा करतो.

-फिरोज शेख, शिक्षक

Web Title: Angry teachers threw garbage at the door of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.