Join us

संतप्त महिलांचा डोंबिवलीत रेलरोको

By admin | Published: November 19, 2014 3:59 PM

डोंबिवली स्टेशनवर सकाळी १०.३४ ला येणारी लोकल गेल्या अनेक दिवसांपासून उशीराने धावत असल्यामुळे वैतागलेल्या महिलांनी आज रेल रोको केला.

ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. १९ - कधी रुळ तर कधी ओव्हरहेड वायर तुटली, तर कधी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकलसेवा विस्कळीत झाल्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. रेल्वेच्या या रोजच्या गोंधळामुळे वैतागलेल्या मुंबईकरांचा अखेर आज भडका उडाला आणि बुधवारी सकाळी डोंबिवली स्थानकात महिलांनी उत्स्फूर्त रेल रोको केला. 
डोंबिवली स्टेशनवर सकाळी १०.३४ ला येणारी लोकल गेल्या अनेक दिवसांपासून उशीराने धावत आहे. ऐन गर्दीच्या वेळेस लोकलला होणा-या उशीरामुळे चाकरमानी स्त्रियांना रोज गर्दीतून प्रवास करावा लागतो आणि ऑफीसमध्ये पोचायलाही बराच उशीर होतो. याबद्दल अनेकवेळा तक्रार करूनही रेल्वेचा कारभार काही सुधारत नव्हता. या सर्व गोष्टांमुळे वैतागलेल्या महिलांनी अखेर डोंबिवली स्थानकात उत्स्फूर्त रेल रोको केला. सरळ रुळांवर उतरत निषेधाच्या घोषणा देत त्यांनी सीएसटीच्या दिशेने निघालेली अडवून धरली. 
महिलांच्या या उद्रेकानंतर आतातरी रेल्वे प्रशासन योग्य धडा शिकून आपली कामगिरी सुधारेल अशी अपेक्षा आहे.