Join us

त्या वृद्धेच्या आक्रोशाने मन हेलावून गेले, 'इलक्शन आठवणी'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 2:05 AM

इलक्शन आठवणी

ग्रामीण भागातील महिलावर्गात इंदिरा गांधी यांच्याविषयी आजही आस्था आहे. वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या वृद्ध महिला आजही इंदिरा गांधी यांना विसरू शकलेल्या नाहीत. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत याचा प्रत्यक्ष अनुभव आला. या निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर युती न झाल्याने काँग्रेस पक्षाने मला ऐरोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविण्याची संधी दिली. या निवडणुकीत प्रचार करताना एका ८६ वर्षांच्या वृद्ध महिलेने माझे औक्षण केले. औक्षण करताना ती सतत इंदिरा गांधी यांचे नाव स्मरत होती. अचानक ती रडू लागली, तिचा हा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. ती निवडणूक हारलो; पण तो क्षण मात्र आजही मनात घर करून राहिला आहे.नवी मुंबई हे कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. या शहरात विविध राज्य व प्रांतातील लोक राहतात. पोटाची खळगी भरण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे या शहरात स्थलांतरित झाली.

मुलाबाळांच्या संगोपनासाठी आपले गाव सोडणाऱ्या पिढीने आता वयाची सत्तरी ओलांडली आहे. या काळात त्यांनी अनेक निवडणुका पाहिल्या. अनेक नेत्यांची भाषणे ऐकली. त्यांच्या प्रचारात सहभाग घेतला. मात्र, या जुन्या पिढीतील मतदारांनी इंदिरा गांधीच्या स्मृती आजही अबाधित ठेवल्याचे या निवडणुकीतील प्रचारादरम्यान जाणवले.

विशेषत: झोपडपट्टी भागात इंदिरा गांधी यांच्या आठवणी जपणाऱ्या अनेक वृद्ध महिला आढळून आल्या. अनेकांनी विस्मृतीत गेल्याला क्षणांना उजाळा देण्याचा अशस्वी प्रयत्न केला. यापूर्वी मी अनेक निवडणुका पाहिल्या होत्या. पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता, त्यामुळे प्रत्यक्ष मतदारांशी तसा फारसा संबंध आला नव्हता. त्या निवडणुकीत मी स्वत:च उमेदवार असल्याने मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधता आला. वयाची साठी ओलांडलेल्या मतदारांत इंदिरा गांधी यांच्याविषयी भावनिक नाते आजही अबाधित असल्याचे या निवडणुकीतून दिसून आले.

ऐरोली परिसरातील एका झोपडपट्टीत प्रचार करीत असताना एक ८६ वर्षांची महिला पुढे आली. तिच्या हातात औक्षणाचे ताट होते. तरुण व मध्यमवर्गीय महिला बाजूला उभ्या होत्या. या वृद्ध महिलेचा उत्साह बघून मीही काहीसा भारावून गेलो. औक्षण झाल्यानंतर ती महिलाइंदिरा गांधींच्या आठवणी सांगू लागली. बोलता बोलता तिला रडू कोसळले. या प्रसंगाने माझ्यासह उपस्थित कार्यकर्ते काही क्षणासाठी गोंधळून गेले. या निवडणुकीत माझा पराभव झाला. मात्र, त्या वृद्ध महिलेचे रडणे आजही स्मरणातून गेलेले नाही.रमाकांत म्हात्रे,माजी उपमहापौर

टॅग्स :निवडणूकइंदिरा गांधी