मुंबई : मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) बेस्टच्या आणिक बस आगारात ट्रान्सपोर्ट हबची (एकत्रिकृत परिवहन हब) निर्मिती केली जाणार आहे. आगारातील जागा एमएमआरडीएला देण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना एकाच ठिकाणी बेस्ट बस, मेट्रो रेल्वे अणि आंतरराज्य बस टर्मिनसची (आयएसबीटी) सुविधा उपलब्ध होणार आहे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करून, भविष्यात शहरातील वाहतुकीवर पडणारा ताण कमी करण्यासाठी एमएमआरडीएकडून ट्रान्सपोर्ट हबची संकल्पना पुढे आली आहे. त्यानुसार, प्राधिकरणामार्फत वडाळा विभागाचा व्यवसायिक, परिवहन आणि गृहनिर्माण दृष्टीने विकास केला जाणार आहे. येथील आणिक बस आगाराची जागा मोठी असल्याने, या योजनेमध्ये एमएमआरडीएच्या विनंतीनुसार समावेश करण्यात आला आहे.आगारातील १६ हेक्टर जागेचा वापर करू दिल्यास, बेस्ट उपक्रमाला भरपाई म्हणून महसुलात वाटा मिळणार आहे. या योजनेचा अंतिम आराखडा समिती सदस्यांच्या विनंतीनुसार सादर केला जाणार असल्याचे, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांंनी सांगितले. हबमध्ये आंतरराज्य बस टर्मिनस, मेट्रो कास्टिंग यार्ड आणि बस आगाराचा समावेश असणार आहे. याचे बांधकाम टप्प्याटप्याने करण्यात येणार आहे.
आणिक बस आगारात मेट्रो रेल्वे आणि आंतरराज्य बस टर्मिनस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 3:03 AM