मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: प्रबोधन गोरेगावतर्फे सुरू असलेल्या आंतर शालेय क्रीडा महोत्सवातील शालेय जलतरण स्पर्धेचा शुभारंभ ओझोन स्विमिंग अकॅडमी येथे प्रबोधन गोरेगावचे संस्थापक व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुभाष देसाई म्हणाले की,प्रबोधन गोरेगावने २००४ मध्ये हा स्विमिंग पूल सुरु केला. तेव्हापासून आजपर्यंत येथील सुविधांचा लाभ जलतरणपटू घेत आहेत. तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वीमर्सने विविध स्पर्धांमध्ये चमक दाखवली आहे.
मी महोत्सवाचे आयोजक, प्रशिक्षक तसेच खेळाडूंना शुभेच्छा देतो. इतक्या मोठ्या संख्येने नावनोंदणी केलेल्या स्पर्धकांचेही मी अभिनंदन करतो." यावेळी दोहा, वर्ल्ड मास्टर्स स्पर्धा २०२४ करिता निवड झालेल्या जलतरणपटू प्रबोधन, ओझोनच्या स्नेहल भाल यांचा सुभाष देसाई यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्नेहल यांनी २०२३ मध्ये मंगलोर येथे झालेल्या नॅशनल मास्टर्स स्विमिंग टूर्नामेंट मध्ये ६ सुवर्ण पदके जिंकली आहेत. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात रामनिवास बजाज इंग्लिश स्कुल, मालाड (प) आनिका भाटियाने ६ सुवर्ण पदके पटकावली. १२ वर्षांखालील मुलांमध्ये समर्थ विक्रम (पोद्दार इंटर.सीबीएसई) ४ सुवर्ण पदकांचा मानकरी ठरत सर्वोत्कृष्ठ जलतरणपटू म्हणून घोषित करण्यात आले.
स्विमिंगमध्ये ३८० स्पर्धक सहभागी झाले होते. विविध ८, १०, १२, १४ आणि १६ वर्षांखालील वयोगटात ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातील ८ वर्षांखालील मुलांच्या गटात ५० मी. बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, फ्री स्टाईल आणि बटरफ्लाय स्ट्रोक मध्ये सेंट. जॉन हायस्कुल, बोरिवलीच्या आर्यव रेडकरने २ सुवर्ण आणि २ रौप्य पदकांची कमाई करून विजेते पद पटकावले. तर उत्पल संघवी शाळा, विलेपार्लेचा शिवांश आठल्ये ५० मी. बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, फ्री स्टाईल आणि बटरफ्लाय स्ट्रोक मध्ये २ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. १२ वर्षांखालील मुलींच्या गटात धीरूभाई अंबानी इंटर. स्कुल, वांद्रेची विद्यार्थी तानिशी मुजुमदार (०३:१८.३६) ५ सुवर्ण पदकांची मानकरी ठरली. तानिशीने ५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय स्ट्रोक, फ्री स्टाईल, १०० मी. स्टाईल आणि २०० मी. मध्ये मध्ये वैयक्तिक पदक प्राप्त केले. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात आनिकाने १०० मी. बॅक स्ट्रोक, १०० मी. ब्रेस्ट स्ट्रोक, १०० मी. बटरफ्लाय, ५० मी. फ्री स्टाईल, १०० मी. फ्री स्टाईल, २०० मी. मध्ये वैयक्तिक पदक मिळवले.