अनिल अंबानी रिलायन्स सेंटर विकण्याच्या तयारीत; कर्जाच्या परतफेडीसाठी प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 05:30 AM2019-07-02T05:30:58+5:302019-07-02T05:35:02+5:30
सांताक्रुझला पश्चिम एक्स्प्रेस महामार्गापाशी असलेले मुख्यालय विकून वा भाडेपट्टीने देऊ न आपल्या बॅडॉर्ड एस्टेट येथील कार्यालयात रिलायन्स समूहाने जाण्याची तयारी सुरू केली आहे.
मुंबई : कर्जाच्या ओझ्याखालील उद्योगपती अनिल अंबानी यांचा रिलायन्स समूह मुंबईतील सांताक्रुझ येथील मुख्यालय विकण्याच्या वा दीर्घ काळासाठी भाडेपट्टीवर देण्याच्या तयारीत आहे. दोन्ही विमानळांपासून जवळ असलेले हे मुख्यालय विक्री वा भाडेपट्टीवर देण्याबाबत काही जागतिक कंपन्यांशी रिलायन्स समूहाची चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे.
सांताक्रुझला पश्चिम एक्स्प्रेस महामार्गापाशी असलेले मुख्यालय विकून वा भाडेपट्टीने देऊ न आपल्या बॅडॉर्ड एस्टेट येथील कार्यालयात रिलायन्स समूहाने जाण्याची तयारी सुरू केली आहे. सांताक्रुझ येथील रिलायन्स सेंटर तब्बल ७ लाख चौरस फूट आकाराचे असून, ते विकल्यास अनिल अंबानी यांच्या समूहाला दीड ते दोन हजार कोटी रुपये मिळू शकतील, असा अंदाज आहे. आपल्याकडे असलेल्या मालमत्ता विकून कर्जाची फेड करण्याचा अनिल अंबानी यांचा विचार दिसत आहे.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटलवर १८ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. या वर्षभरात त्यापैकी किमान ५0 टक्के कर्जाची परतफेड करण्याचा विचार अनिल अंबानी यांनी अलीकडेच बोलून दाखवला होता.
अनिल अंबानी यांच्या समूहावर असलेल्या प्रचंड कर्जामुळे आणि ते फेडणे शक्य न झाल्याने वित्त क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी त्यांचे क्रेडिट रेटिंग आताच कमी केले आहे.
ब्लॅकस्टोन घेणार विकत?
सांताक्रुझच्या रिलायन्स सेंटरची मालकी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे आहे. हे मुख्यालय तसेच मुंबईतील अन्य मालमत्ता विकण्याच्या वृत्ताला रिलायन्सच्या प्रवक्त्याने दुजोरा देताना, त्याविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला. ब्लॅकस्टोन ही कंपनी ते मुख्यालय घेण्याच्या विचारात असली तरी त्या कंपनीनेही वृत्ताबाबत काही सांगण्यास असमर्थता व्यक्त केली. हे मुख्यालय विकण्याची जबाबदारी अमेरिकेतील जेएलएल कंपनीला दिली जाण्याची चर्चा आहे.