मुंबई शिक्षक मतदार संघातून शिक्षक परिषदेतर्फे अनिल बोरनारे यांना उमेदवारी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 02:49 PM2018-03-25T14:49:18+5:302018-03-25T14:49:18+5:30
विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मुंबई शिक्षक मतदार संघातून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे अनिल बोरनारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई - विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मुंबई शिक्षक मतदार संघातून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे अनिल बोरनारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
काल शिक्षक परिषदेच्या पुणे येथील राज्य कार्यकारिणीच्या सभेमध्ये सर्वानुमते हा निर्णय जाहीर करण्यात आला. शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, सरकार्यवाह नरेंद्र वातकर, कोषाध्यक्ष किरण भावठणकर, मुंबईच्या माजी शिक्षक आमदार संजीवनी रायकर, नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार, पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, बाबासाहेब काळे यांच्यासह राज्यातील सर्व विभागातील शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित सरकार्यवाह नरेंद्र वातकर यांनी अनिल बोरनारे यांच्या नावाची सर्वानुमते घोषणा केली.
जून २०१८ मध्ये विधान परिषदेची मुंबई शिक्षक मतदार संघाची निवडणूक होणार असून शिक्षक परिषदेकडून अनिल बोरनारे निवडणूक लढणार आहेत.
शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत अनेक वर्षांपासून अनिल बोरनारे शासन दरबारी आवाज उठवीत असून मुंबईतील शिक्षकांच्या सेवाशर्तींच्या प्रश्न सोडवीत असतात. शिक्षणाचे खाजगीकरण-कंपनीकरण, जुनी पेंशन योजना, सातवा वेतन आयोग, कॅशलेस मेडिक्लेम योजना, मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न, शिक्षकेतरांचा आकृतिबंध यासह अन्य शैक्षणिक प्रश्नावर शासन दरबारी आवाज उठविणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.
राज्यातील अनेक शैक्षणिक आंदोलनात त्यांचा सहभाग असून विना अनुदानित प्रश्नांवर रास्ता रोको करणे, सेवाग्राम ते नागपूर पदयात्रेत सहभाग, शिक्षकांशी असलेला जनसंपर्क व अनेक उपोषणात ते सहभागी झाले आहेत. त्यांच्या शैक्षणिक कार्याच्या योगदानाची दखल घेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने त्यांना विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी उमेदवारी जाहिर केली आहे