मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम हे राजकीय हेतूपोटी होतंय, अनिल देशमुखांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 06:29 PM2021-05-11T18:29:18+5:302021-05-11T18:34:05+5:30
Anil Deshmukh: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
Anil Deshmukh: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सीबीआयच्या चौकशीनंतर आता ईडी देखील अनिल देशमुख यांची चौकशी करणार असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारवर रोखठोक आरोप केले आहेत.
"मला मीडियाच्या माध्यामातून माहिती मिळतेय की माझी ईडीद्वारे चौकशी केली जाणार आहे. मागच्या काळात सीबीआयच्या माध्यमातून चौकशी झाली. आता ईडीच्या माध्यमातून होणार आहे. मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम हे राजकीय हेतूपोटी होत आहे", असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं। pic.twitter.com/odOj1uG9AO
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 11, 2021
"मी गृहमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरणात कारवाई केली. त्याचबरोबर सीबीआयला जी महाराष्ट्रात कोणताही तपास करण्याची मुभा होती त्यावर आम्ही निर्णय घेऊन शासनाच्या परवानगी शिवाय चौकशी करू शकत नाही, असा निर्णय घेतला. दादरा नगर हवेलीचे खासदार आत्महत्या प्रकरण मी विधानसभेत मत मांडलं. त्यामुळे केंद्र शासन नाराज असू शकते. म्हणून माझी चौकशी होत असावी. मात्र सत्य पुढे येईल", असा केंद्रावर थेट आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.
कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने चार आठवड्यांनंतर सुनावणी ठेवली. तोपर्यंत देशमुख यांना कठोर कारवाईपासून संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर, आता अनिल देशमुख यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुन्हा दाखल केला आहे.