अनिल देशमुख, परमबीर सिंह यांच्या चौकशीसाठी आता शिक्षकाचीही उच्च न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:05 AM2021-03-31T04:05:32+5:302021-03-31T04:05:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कथित भ्रष्टाचारप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कथित भ्रष्टाचारप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची स्वतंत्र चौकशी करण्याकरिता उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबईच्या मोहन प्रभाकर भिडे या शिक्षकांनी उच्च न्यायालयात दाखल केली.
अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करावी, यासाठी खुद्द परमबीर सिंह यांनीही उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्याव्यतिरिक्त आणखी दोन याचिका व ही याचिका मिळून याप्रकरणी एकूण चार याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या.
देशमुख व सिंह यांच्यामध्ये झालेले संभाषण ऐकल्यावर हेच निष्पन्न होते की, त्या दोघांपैकी एक दोषी आहे किंवा सत्य लपवण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी, अशी मागणी भिडे यांनी केली. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.