आरोपाबाबत जबाब नोंदविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दरमहा १०० कोटी हप्ता वसुलीच्या करण्यात आलेल्या आरोपासंदर्भात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची बुधवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेकडून (सीबीआय) चौकशी केली जाईल. जबाब नोंदवण्यासाठी सकाळी अकरा वाजता अंधेरीतील डीआयओच्या कार्यालयात हजर राहण्याबाबत त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या नऊ दिवसांपासून ही चौकशी सुरू आहे. रविवारी याचप्रकरणी देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व सहाय्यक एस. कुंदन यांची सुमारे आठ तास चौकशी करून जबाब नोंदविण्यात आले. आता देशमुख यांचा जबाब नोंदवला जाईल. त्यानंतर सीबीआय सोमवारी प्राथमिक चौकशीचा अहवाल आपल्या निष्कर्षासह उच्च न्यायालयात सादर करणार आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांनी निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेला दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याच्या केलेल्या आरोपाबाबत १५ दिवसांमध्ये प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. त्यानुसार गेल्या मंगळवारपासून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. आतापर्यंत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या अंमलबजावणी विभागाचे उपायुक्त राजू भुजबळ आणि सहायक आयुक्त संजय पाटील तसेच एनआयएच्या ताब्यातील सचिन वाझेचे सविस्तर जबाब नोंदविण्यात आले आहेत.
.........................