अनिल देशमुखाकडे उद्या चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:06 AM2021-04-13T04:06:24+5:302021-04-13T04:06:24+5:30
सीबीआयचे समन्स लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने (सीबीआय) दरमहा १०० कोटी हप्ता वसुलीच्या ...
सीबीआयचे समन्स
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने (सीबीआय) दरमहा १०० कोटी हप्ता वसुलीच्या आरोपाच्या चौकशीचा प्राथमिक तपास अंतिम टप्यात आणला आहे. याप्रकरणातील मुख्य संशयित माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. त्यानुसार येत्या बुधवारी (दि.१४) त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजाविण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
सीबीआयच्या पथकने रविवारी देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व सहायक एस. कुंदन यांची सुमारे आठ तास कसून चौकशी केली. त्यांचे स्वतंत्रपणे जबाब नोंदविण्यात आले असून, आता देशमुख यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. १४ एप्रिलला डीआयओच्या कार्यालयात हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याच्या केलेल्या आरोपाबाबत १५ दिवसांमध्ये प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. त्यानुसार गेल्या मंगळवारपासून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. आतापर्यंत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या अंमलबजावणी विभागाचे उपायुक्त राजू भुजबळ आणि सहायक आयुक्त संजय पाटील तसेच एनआयएच्या ताब्यातील सचिन वाझे याचे सविस्तर जबाब नोंदविण्यात आले आहेत.