Join us

अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल; मुंबई, नागपूरच्या निवासस्थानासह १० ठिकाणी छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महिन्याला शंभर कोटींच्या हप्ता वसुलीप्रकरणाच्या कथित आरोपाबद्दल राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महिन्याला शंभर कोटींच्या हप्ता वसुलीप्रकरणाच्या कथित आरोपाबद्दल राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल करून त्यांच्या मुंबई, नागपूर येथील निवासस्थानासह एकूण विविध १० ठिकाणी शनिवारी छापे टाकले.

नागपूर येथील घरी देशमुख यांची नऊ तासांहून अधिक काळ चौकशी सुरू असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईतील सरकारी निवासस्थान ज्ञानेश्वरी व त्यांच्या वरळी येथील सुखदा अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्येही जवळपास सात तास झडती घेण्यात आली. तेथून अनेक दस्तावेज, कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे समजते.

सीबीआयच्या दिल्ली व मुंबई पथकातील एकूण सुमारे ६० जणांच्या पथकाने शनिवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मुंबई, नागपूर, ठाणे व पुण्यात ठिकठिकाणी स्वतंत्रपणे या कारवाईला सुरू केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाआघाडीचे नेते व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आराेप ‘लेटरबॉम्ब’द्वारे केला हाेता. यासंदर्भात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाने १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्व संबधितांचे जबाब नोंदवून तपास करण्यात आला. त्याबाबतचा अहवाल सीबीआयच्या महासंचालकाकडे सादर केल्यानंतर शुक्रवारी दिल्लीत अनिल देशमुख व अन्य पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार, सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक दिल्लीहून नागपूर आणि मुंबईत पोहोचले. शनिवारी त्यांनी देशमुख यांची नागपूर, मुंबई, ठाणे व पुणे येथील निवासस्थाने तसेच कार्यालयांवर छापे टाकले.

* सीसीटीव्ही फुटेज, लॅपटॉप, प्रिंटर जप्त

मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यावर जाऊन शुक्रवारी रात्री सीबीआयच्या पथकाने तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी पुन्हा दोन स्वतंत्र पथकांनी तेथे व वरळीतील सुखदा अपार्टमेंटमधील देशमुख यांच्या ११०१ क्रमांकाच्या फ्लॅटवर छापा टाकला. तेथून लॅपटॉप, प्रिंटर व अन्य दस्तऐवज जप्त केल्याचे समजते. सुमारे ७ तासांनंतर एका मोठ्या पिशवीत सर्व ऐवज जमा करून चर्चगेट येथील सीबीआयच्या गेस्ट हाऊसमध्ये पथक माघारी परतले. त्यांनी अधिकृतपणे काहीही माहिती देण्यास नकार दिला.

* पीपीई किटचे संरक्षण

सीबीआयच्या कारवाईवेळी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पीपीई किट परिधान केले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांनी ही दक्षता घेतली होती. छाप्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त वाढविला.

-----------------------------

,