अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 06:01 AM2021-06-29T06:01:22+5:302021-06-29T06:01:40+5:30
पीएंच्या चाैकशीनंतर बजाविले समन्स
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वादात सापडलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंगळवारी (२९ जून) सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी सकाळी अकरा वाजता त्यांना कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहेत.
देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना ईडीने शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेने दिलेल्या जबाबामध्ये या दोघांच्या सांगण्यावरून तीन महिन्यांत त्यांना एकूण ४.७० कोटी दिल्याचे नमूद आहे. त्याच्याकडून ही रक्कम दिल्लीत आणि तेथून नागपूरला एका ट्रस्टकडे वळविण्यात आल्याची माहिती ईडीच्या तपासातून समोर आली आहे.
हप्तावसुलीबाबत करणार विचारणा!
ईडीने शुक्रवारी देशमुख यांच्या नागपूर व मुंबई येथील निवासस्थानी छापे टाकले हाेते. देशमुख यांच्याकडेही चौकशी केली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा चौकशीसाठी कार्यालयात हजर रहाण्यास बोलाविले होते. मात्र, त्यांनी चौकशी नेमकी कोणत्या विषयासंबंधी करायची आहे, हे प्रथम कळवावे, अशी मागणी वकिलांमार्फत करीत देशमुख यांनी चाैकशीला जाण्याचे टाळले. ईडीने त्याचदिवशी पुन्हा नव्याने समन्स बजाविताना मुंबईतून झालेल्या हप्तावसुलीबाबत चौकशी करायची असल्याचे नमूद करीत २९ जूनला ११ वाजता हजर राहण्यासाठी समन्स बजावले. त्यामुळे अत्यावश्यक कारण उद्भवल्याशिवाय देशमुख यांना चाैकशीला जाणे टाळता येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.