Join us  

जेलमध्ये अनिल देशमुख चक्कर येऊन पडले; जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 5:04 PM

भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने अलीकडेच अनिल देशमुखांवर आरोपपत्र दाखल केले आहे

मुंबई - १०० कोटींच्या कथित वसुलीच्या आरोपावरून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. शुक्रवारी सकाळी देशमुख आर्थर रोड कारागृहात चक्कर येऊन कोसळले त्यामुळे त्यांना उपचारासाठी परळ येथील KEM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. 

भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने अलीकडेच अनिल देशमुखांवर आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली आहे असे  विशेष सीबीआय न्यायालयाने म्हणत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह संजीव पालांडे व कुंदन शिंदे यांचा जामीन अर्ज फेटाळला. देशमुख आर्थर रोड जेलमध्ये आहेत. शुक्रवारी सकाळी अचानक देशमुख चक्कर येऊन पडले. त्यानंतर अनिल देशमुखांच्या छातीत दुखत असल्याने व त्रास जास्त असल्याने त्यांना तातडीने जे जे रुग्णालयात पुढील उपचारासाठी आणण्यात आले आहे. त्यांचा बि.पी. वाढला आहे व ई.सी.जी. Abnormal आला असून तज्ञ डॉक्टरांचे चम्मू त्यांची तपासणी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी असाच त्रास होत असल्याने त्यांना सुरुवातीला जेजे रुग्णालयात व नंतर KEM रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

सचिन वाझे बनला माफीचा साक्षीदारमनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार होण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) परवानगी दिली आहे. १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी वाझेने दर्शवली होती. ईडीच्या परवानगीमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणींत वाढ झाली होती. 

काय आहे प्रकरण?अनिल देशमुख व त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे व स्वीय सहायक कुंदन शिंदे हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरण व भ्रष्टाचाराप्रकरणी आरोपी आहेत. तपासादरम्यान जमा केलेल्या मौखिक व कागदोपत्री पुरावे व वाझे याने दिलेला जबाब, हे एकमेकांची पुष्टी करत आहेत. काही ठिकाणी त्याचा जबाब अगदी महत्त्वाचा आहे. वसुलीद्वारे आलेल्या पैशांवर देखरेख व ते देशमुखांकडे सोपवण्याची पालांडे व शिंदे यांच्या कार्यपद्धतीची माहिती वाझेला होती. देशमुख १०० कोटी वसुलीच्या कटातील मुख्य सूत्रधार आहेत, असे ईडीने म्हटलं आहे. 

टॅग्स :अनिल देशमुखगुन्हा अन्वेषण विभाग