लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर १३ महिने २७ दिवसांनी आर्थर रोड कारागृहातून बाहेर आल्यानंतर दिग्गज नेतेमंडळींच्या उपस्थितीत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी देशमुख यांनी आपल्याला खोट्या आरोपात फसवण्यात आल्याचा आरोप केला. मात्र, न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे स्पष्ट करत त्यांनी सर्वांचे आभार मानले.
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुली आरोपावरून देशमुख यांना गेल्या वर्षी १ नोव्हेंबर रोजी ईडीने अटक केली. काही दिवसांपूर्वीच त्यांना जामीन मंजूर झाला होता. मात्र, त्यावर सीबीआयने आक्षेप घेतल्याने त्यांकारागृहातला मुक्काम वाढला. अखेर त्यांना जामीन मंजूर झाल्याने बुधवारी सायंकाळी ५ वाजता देशमुख यांची कारागृहातून सुटका झाली.
अनिल देशमुख म्हणाले…
- मला खोट्या आरोपात फसवण्यात आले आहे. परमबीर सिंह यांनी माझ्यावर १०० कोटी रुपयांचा खोटा आरोप लावला. त्याच परमबीर यांनी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगासमोर जाऊन प्रतिज्ञापत्र देत, जे आरोप केले ते फक्त ऐकीव माहितीवर आधारित असल्याचे नमूद केले. तसेच काहीही पुरावा नसल्याचे सांगितले.
- मुंबईतील उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणात परमबीर यांचे निकटवर्तीय सचिन वाझेला अटक झाली आहे. तीन वेळा त्याला निलंबित करण्यात आले आहे. अशा व्यक्तीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले होते. माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नव्हते.
समर्थक, नेत्यांची एकच गर्दी
- देशमुख यांच्या स्वागतासाठी त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आदी दिग्गज नेते आणि असंख्य कार्यकर्ते आर्थर रोड कारागृहाबाहेर उपस्थित होते.
- मोठ्या जल्लोषात देशमुख यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहून देशमुख भारावले. देशमुख यांनी उपस्थित असलेल्या नेत्यांना पेढे भरवत, गाडीत बसून स्वागतासाठी जमलेल्या समर्थकांना हात देत आभार मानले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"