लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्या. कैलास चांदीवाल आयोगाने मंगळवारी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. देशमुख यांचे वकील आयोगासमोर हजर न झाल्याने आयोगाने हा दंड सुनावला.
देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीप्रकरणी असलेल्या आरोपांची चौकशी न्या. चांदीवाल आयोग करीत आहे. सध्या साक्षी नोंदविण्यासंबंधीचे कामकाज सुरू आहे. साक्षींसंदर्भात देशमुख यांच्या वतीने कामकाज बघणारे ॲड. गिरीश कुलकर्णी मंगळवारी हजर झाले नाहीत. या गैरहजेरीबद्दल न्या. चांदीवाल यांनी ‘कॉस्ट’ म्हणून ५० हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचे आदेश देशमुख यांना दिले. एक आठवड्याच्या आत ही रक्कम त्यांना जमा करावी लागेल. न्या. चांदीवाल यांनी ॲड. गिरीश कुलकर्णी यांना बुधवारी उलटतपासणीसाठी हजर राहण्यास सांगितले.