मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी आरोपी असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज सोमवारी फेटाळला. अनिल देशमुख यांना ईडीने २ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
देशमुख यांचा आर्थिक गैरव्यवहारात सहभाग आहे, हे दर्शविणारे भक्कम पुरावे ईडीकडे आहेत. साक्षीदारांच्या जबाबात तफावत असली तरी या टप्प्यावर ते तपासू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवित विशेष न्यायालयाचे न्या. आर. एन. रोकडे यांनी सोमवारी अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला.
देशमुख यांचा हा पहिला नियमित जामीन अर्ज होता. त्याआधी त्यांनी आपसुक जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तांत्रिक कारणास्तव तो फेटाळण्यात आला. आपण तपास यंत्रणेचेच बळी आहोत. काही स्वार्थी लोकांच्या हातून आपली छळवणूक करण्यात येत आहे. काही अधिकारी सत्ता व अधिकारांचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेला छेद देऊन दहशतीचे राज्य निर्माण केले आहे, असे अनिल देशमुख यांनी जामीन अर्जात म्हटले आहे.
ईडीने देशमुख यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. सदर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अनिल देशमुख मुख्य सूत्रधार असल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले. देशमुख यांच्या आदेशावरून निलंबित पोलीस सचिन वाझे याने बार व रेस्टॉरंट मालकांकडून खंडणी उकळली, असा ईडीने युक्तिवाद केला. ईडीच्या म्हणण्यानुसार, अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी पदाचा गैरवापर करत वाझेद्वारे मुंबईतही बार व रेस्टॉरंटवाल्यांकडून ४.७० कोटी रुपये जमा केले. देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या नागपूरच्या श्री साई शिक्षण संस्थेत ही रक्कम वळविण्यात आली, असा ईडीचा दावा आहे.