अनिल देशमुख जामिनास पात्र नाहीत: सीबीआय; चांदीवाल आयोगाचे निष्कर्षही नाकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 05:26 AM2022-10-15T05:26:12+5:302022-10-15T05:26:50+5:30
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भ्रष्टाचाराप्रकरणी दाखल केलेल्या जामीन अर्जाला सीबीआयने विरोध केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भ्रष्टाचाराप्रकरणी दाखल केलेल्या जामीन अर्जाला सीबीआयने शुक्रवारी विरोध केला.
काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने देशमुख यांचा जामीन मंजूर केला. ईडीने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. मात्र, भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयनेही देशमुख यांना ताब्यात घेतल्याने ते सध्या कारागृहातच आहेत. याही प्रकरणी जामिनावर सुटका व्हावी, यासाठी देशमुख यांनी विशेष सीबीआय न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्यावर सीबीआयने प्रतिज्ञापत्र दाखल केले. ‘अनिल देशमुख यांच्यावर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते जामिनाचा आश्रय घेऊ शकत नाहीत. मोठे सरकारी पद सांभाळणाऱ्या व्यक्तीने मोठा गुन्हा केला असल्याने ते जामिनास पात्र नाहीत’, असे सीबीआयने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
चांदीवाल आयोगासमोर दिलेल्या साक्षीवर विसंबून राहता येणार नाही. कारण आयोगाला कायदेशीर पावित्र्य नाही. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर केलेल्या आरोपांची चौकशी आयोग करत आहे. देशमुख यांचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध करणाऱ्या तोंडी व कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केल्याचे सीबीआयने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"