‘ईडी’च्या आरोपपत्रात देशमुखांचे नाव नाही; वारंवार गैरहजर राहिल्याने चौकशी अपूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 05:27 AM2021-09-18T05:27:50+5:302021-09-18T05:28:22+5:30
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात त्यांचे नावच नसल्याचे समोर आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात त्यांचे नावच नसल्याचे समोर आले. ईडीने चौकशीसाठी बजावलेल्या समन्सविरोधात देशमुख यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्यामुळे त्यांची अद्याप चौकशी होऊ शकली नाही, असे कारण ईडीने दिले आहे. आरोपपत्रात आरोपींच्या यादीत सचिन वाझे, देशमुखांचे सहायक पालांडे आणि कुंदन शिंदेसह
१४ जणांचा समावेश आहे. मुंबईतील बार मालकांकडून वसुली प्रकरणात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
‘दोन कोटी मागितले’
‘मला मुंबई पोलीस दलात पुन्हा रुजू करून घेण्यास विरोध करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी अनिल देशमुख यांनी माझ्याकडे दोन कोटी रुपये मागितले होते,’ असा आरोप निलंबित पोलीस सचिन वाझे याने केला आहे.
प्राप्तिकरच्या धाडी
प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी नागपूर, काटोल आणि मुंबई येथील देशमुख यांची घरे व कार्यालयांवर धाडी टाकल्या. या धाडीत रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती आहे.