Join us

अनिल देशमुख आज तुरुंगाबाहेर!; जामिनाला आणखी किती स्थगिती? हायकोर्टाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 5:49 AM

१०० कोटी वसुली प्रकरणात कारागृहात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: १०० कोटी वसुली प्रकरणात कारागृहात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला. देशमुख यांच्या जामिनावरील स्थगिती आणखी वाढविण्याची सीबीआयची मागणी हायकोर्टाने मंगळवारी फेटाळली. याला स्थगिती मागणे आणखी किती काळ चालणार? अशा शब्दांत कोर्टाने सीबीआयला फटकारले. देशमुख बुधवारी कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यांनी कारागृहात १३ महिने २६ दिवस काढले आहेत.

१२ डिसेंबरला न्या. मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठाने देशमुख यांना जामीन मंजूर केला. नंतर सीबीआयने सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी जामिनावर १० दिवसांची स्थगिती देण्याची विनंती केली होती. ती मान्य झाली. मात्र, सुप्रीम कोर्टाचे सुटीकालीन कोर्ट नसल्याने सीबीआयने पुन्हा हायकोर्टात जामिनावरील स्थगिती ३ जानेवारीपर्यंत वाढविण्याची विनंती केली. मात्र, कोर्टाने ती अमान्य केली होती. 

‘तुमची विनंती मान्य करू शकत नाही’

‘हे आणखी किती काळ चालेल? सुटीकालीन कोर्टाचा न्यायमूर्ती म्हणून मी नियमित कोर्टाच्या आदेशाकडे कसे दुर्लक्ष करणार? मी कोणताही आदेश देणार नाही,’ असे न्या. एस. जी. चपळगावकर यांच्या एकलपीठाने  म्हटले. जामिनाला आणखी मुदतवाढ न देण्यासंदर्भात २१ डिसेंबरला दिलेला आदेश विचारात घेता ही स्थगिती वाढवण्याची विनंती मान्य करू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अनिल देशमुखमुंबई हायकोर्ट