बेकायदा काम करण्यासाठी अनिल देशमुखांचा दबाव; सचिन वाझेचा देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 10:22 AM2024-08-06T10:22:51+5:302024-08-06T10:23:13+5:30

सचिन वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सोमवारी त्याला विशेष खासदार आणि आमदार न्यायालयाचे न्या. ए. यू. कदम यांच्यापुढे हजर करण्यात आले.

Anil Deshmukh pressured to do illegal work; Sachin Vaze mentioned in a letter sent to Devendra Fadnavis | बेकायदा काम करण्यासाठी अनिल देशमुखांचा दबाव; सचिन वाझेचा देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात उल्लेख

बेकायदा काम करण्यासाठी अनिल देशमुखांचा दबाव; सचिन वाझेचा देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात उल्लेख

मुंबई : माजी गृहमंत्री  अनिल देशमुख यांनी अनेक बेकायदा कामे करण्यासाठी दबाव आणला. कधीकधी काही कामे ‘पवार साहेबांकडून’ आल्याचेही सांगितले, असा दावा निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

सचिन वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सोमवारी त्याला विशेष खासदार आणि आमदार न्यायालयाचे न्या. ए. यू. कदम यांच्यापुढे हजर करण्यात आले. त्यावेळी त्याने फडणवीस यांना लिहिलेल्या पात्राची माहिती दिली. अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात गृहखात्याची पातळी खालच्या थराला गेली होती. मी पण पीडित आहे. देशमुखांच्या दबावाखाली अनेक बेकायदा कामे केली. माझ्यासारख्या अधिकाऱ्याने ती कामे करणे योग्य नव्हते. अनेक वेळा ‘पाटील साहेबां’कडून काम आले सांगून करून घेण्यात आले. देशमुख यांनी अनेक वेळा ‘मोठे पवार साहेब’ आणि ‘पाटील साहेबां’कडून काम आले सांगत देशमुख यांनी अनेक लोकांवर दबाव आणला, असे पत्रात म्हटले आहे.

मी कधीच ‘पवार साहेब’ कोण हे विचारण्याचे धारिष्ट्य केले नाही. पोलिसांची बदली आणि पदोन्नतीद्वारे त्यांच्या गटाने कोट्यवधी रुपये जमविले. त्यातली काही झाली आणि काही नाही. गुन्हे इंटेलिजन्स युनिटमध्ये असताना माझ्या नेतृत्वाखाली हुक्का पार्लरवर आतापर्यंत सर्वांत मोठा छापा टाकण्यात आला. आम्ही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर हुक्का ताब्यात घेतला आणि गोदामात ठेवला. त्यावेळी जयंत पाटील यांनी मुख्य वितरकाला अटक न करता अन्य दुसऱ्याला अटक करण्याचे आदेश दिले, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. वाझे याने पत्रात तत्कालीन महाविकास आघाडीने चौकशीसाठी नियुक्त चांदीवाल आयोगाबाबतीत पत्रात नमूद केले आहे.

...त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत

 चांदीवाल आयोगानेही देशमुख यांनी तपासावर दबाव आणण्याचा प्रयत्न हाणून पाडला, असा दावा वाझे याने केला आहे. देशमुख यांचे निकटवर्तीय पालांडे यांची महत्त्वाच्या पदावर एक वर्षाहून अधिक काळ कायदेशीर नियुक्ती न करता ठेवता आले होते.

 चांदीवाल आयोगाच्या चौकशीदरम्यान देशमुख यांनी गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन केले. राजीनामा दिल्यानंतरही त्यांनी गोपनीय कागदपत्रांचा वापर केला आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा वाझे याने पत्राद्वारे केला आहे.

Web Title: Anil Deshmukh pressured to do illegal work; Sachin Vaze mentioned in a letter sent to Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.