अनिल देशमुख यांचा सबळ कारणाशिवाय चौकशीस हजर राहण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:05 AM2021-06-27T04:05:33+5:302021-06-27T04:05:33+5:30

ईडी नव्याने समन्स पाठवणार : दाेन्ही खासगी सचिवांना १ जुलैपर्यंत कोठडी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भ्रष्टाचाराच्या गंभीर ...

Anil Deshmukh refuses to appear for questioning without good reason | अनिल देशमुख यांचा सबळ कारणाशिवाय चौकशीस हजर राहण्यास नकार

अनिल देशमुख यांचा सबळ कारणाशिवाय चौकशीस हजर राहण्यास नकार

Next

ईडी नव्याने समन्स पाठवणार : दाेन्ही खासगी सचिवांना १ जुलैपर्यंत कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपावरून गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असलेले राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी आक्रमक भूमिका घेत सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला हजर राहाण्यास नकार दिला. ज्या कारणासाठी चौकशी करायची आहे ते कळविल्यास त्यासंबंधी कागदपत्रांनिशी उपस्थित राहण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. आपल्या वकिलामार्फत त्यांनी ही भूमिका कळवली असून, ईडीकडून त्यांना लवकरच नव्याने समन्स बजाविण्यात येणार असल्याचे समजते.

दरम्यान, ईडीने अटक केलेल्या देशमुख यांचे खासगी स्वीय सचिव संजीव पालांडे व खासगी साहाय्यक कुंदन शिंदे यांना १ जुलैपर्यंत ईडीची कोठडी मिळाली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली होती.

देशमुख यांनी मुंबईतील बारमालकाकडून दरमहा १०० कोटींचा हप्ता वसुलीचे टार्गेट तत्कालीन एपीआय सचिन वाझेला दिले होते, असा आराेप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्यानंतर त्याबाबत सीबीआय व ईडीने चौकशी सुरू केली. शुक्रवारी ईडीने मुंबई, नागपूर येथील देशमुख यांच्या निवासस्थानी छापे टाकून मुंबईत जवळपास आठ तास त्यांची चौकशी केली. त्यानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता कार्यालयात हजर राहाण्याची सूचना केली.

देशमुख यांनी मात्र शनिवारी कार्यालयात जाणे टाळले. त्यांचे वकील जयवंत पाटील हे त्यांच्या सहकाऱ्यांसह साडेअकराच्या सुमारास बेलार्ड पियार्ड येथील ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना समन्सचे उत्तर देताना आपल्या अशिलाकडे कोणत्या विषयासंबंधी चौकशी करायची आहे, त्यासंबंधी कसलाही उल्लेख नाही, तो कळवावा, त्यानुसार संबंधित कागदपत्रे घेऊन त्यांना उपस्थित राहाता येईल, असे सांगितले. देशमुख यांना पुन्हा नव्याने समन्स बजावून चौकशीला पाचारण केले जाईल, असे समजते.

दरम्यान, ईडीने देशमुख यांचे तत्कालीन खासगी सचिव पालांडे व स्वीय साहाय्यक शिंदे यांना शुक्रवारी रात्री उशिरा मनी लाॅण्ड्रिंगच्या गुन्ह्याअंतर्गत अटक केली. तत्पूर्वी त्यांची सुमारे नऊ तास कसून चौकशी केली होती. त्यांच्यावरील आरोप, बारमालक व सचिन वाझेने दिलेल्या जबाबाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांना समाधानकारक खुलासा करता आला नाही. शनिवारी दुपारी त्यांना ईडीच्या कोर्टात हजर केले असता १ जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली.

* समन्समध्ये कसलाच उल्लेख नाही

ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहावे, अशी नोटीस बजाविली आहे. त्यामध्ये कसलाही विषय नमूद केला नसल्याने त्याअनुंषगाने माहिती कळविण्याची विनंती त्यांच्याकडे केली आहे. त्यानुसार संबंधित कागदपत्रे घेऊन ते चौकशीला हजर राहून यंत्रणेला सहकार्य करतील.

-ॲड. जयवंत पाटील,

अनिल देशमुख यांचे वकील

.....................................................................

Web Title: Anil Deshmukh refuses to appear for questioning without good reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.