माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत, PMLA कोर्टाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 03:21 PM2021-11-06T15:21:21+5:302021-11-06T15:22:54+5:30
अनिल देशमुख यांना मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, आता ईडीच्या कोठडीतून देशमुख यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात येईल
मुंबई - सचिन वाझे 100 कोटी 'वसुली प्रकरणात' माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे. देशमुख यांनी गृहमंत्री असताना १०० कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर, न्यायालयाने 6 नोव्हेंबरपर्यंत त्यांना ईडीची कोठडी सुनावली. अनिल देशमुख यांना आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अनिल देशमुख यांना मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, आता ईडीच्या कोठडीतून देशमुख यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात येईल. त्यानंतर, देशमुख यांच्याकडून जामीनासाठी अर्जही करण्यात येऊ शकतो.
Mumbai | Special PMLA court sends former home minister of Maharashtra Anil Deshmukh to 14-day Judicial custody. He was arrested on Nov 1 in a money laundering case. pic.twitter.com/1RYKGoXa6F
— ANI (@ANI) November 6, 2021
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख दिवाळीपूर्वीच, सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. याआधी त्यांना ५ वेळा समन्स बजावण्यात आले होते. देशमुख सोमवारी सकाळी ११.४० वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचले. त्यानंतर १३ तासांनंतर देशमुख यांना ईडीने रात्री १ वाजताच्या सुमारास अटक केली. देशमुख यांची सध्या चौकशी सुरू आहे. ईडीचे सहाय्यक संचालक तसिन सुलतान यांच्याकडून त्यांची चौकशी कररण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांना आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बने खळबळ
दरम्यान, मार्चमध्ये परमबीर सिंग यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. त्यांना होमगार्डचे डीजी बनवण्यात आले. यानंतर परमबीर सिंह यांचे एक पत्र म्हणजेच लेटरबॉम्ब समोर आले, जे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना सचिन वाझे यांच्याकडे दरमहा १०० कोटींची मागणी केल्याचा दावा त्यांनी या पत्रात केला होता. त्यासोबतच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेच्या बदल्यात पैसे घेतल्याचा आरोपही देशमुख यांच्यावर आहे.