मुंबई - सचिन वाझे 100 कोटी 'वसुली प्रकरणात' माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे. देशमुख यांनी गृहमंत्री असताना १०० कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने 6 नोव्हेंबरपर्यंत त्यांना ईडीची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, देशमुख यांना आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. तत्पूर्वी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख दिवाळीपूर्वीच सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. याआधी त्यांना ५ वेळा समन्स बजावण्यात आले होते. देशमुख सोमवारी सकाळी ११.४० वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचले. त्यानंतर १३ तासांनंतर देशमुख यांना ईडीने रात्री १ वाजताच्या सुमारास अटक केली. देशमुख यांची सध्या चौकशी सुरू आहे. ईडीचे सहाय्यक संचालक तसिन सुलतान चौकशी करत आहेत. तसीन सुलतान हेही या प्रकरणातील तपास अधिकारी आहेत.
अनिल देशमुख यांना आज पीएमएलए कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. कोर्टात त्यांच्या वसुली प्रकरणावर सुनावणी होणार असून त्यांच्या कोठडीत वाढ होणार की नाही, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बने खळबळ
दरम्यान, मार्चमध्ये परमबीर सिंग यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. त्यांना होमगार्डचे डीजी बनवण्यात आले. यानंतर परमबीर सिंह यांचे एक पत्र म्हणजेच लेटरबॉम्ब समोर आले, जे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना सचिन वाझे यांच्याकडे दरमहा १०० कोटींची मागणी केल्याचा दावा त्यांनी या पत्रात केला होता. त्यासोबतच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेच्या बदल्यात पैसे घेतल्याचा आरोपही देशमुख यांच्यावर आहे.