Join us

अनिल देशमुख यांना उद्या ईडीसमोर हजर राहावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:06 AM

हप्ता वसुलीची होणार चौकशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वादात सापडलेल्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व ...

हप्ता वसुलीची होणार चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वादात सापडलेल्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला हजर राहावे लागेल. त्यांना पाठविलेल्या दुसऱ्या समन्समध्ये चौकशीचा विषय नमूद केला असल्याने त्यांना आता हजर राहावेच लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

ईडीने शनिवारी चौकशीला हजर राहण्यास बोलाविले असताना देशमुख यांनी समन्समध्ये चौकशी नेमकी कोणत्या विषयासंबंधी करायची आहे, अशी वकिलामार्फत विचारणा करीत चाैकशीला जाण्याचे टाळले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी त्यांना पुन्हा नव्याने समन्स बजाविले. त्यामध्ये मुंबईतून हप्ता वसुली आणि बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याबद्दल चौकशी करायची असल्याचे नमूद केले आहे. ईडीने याबाबत संबंधितांकडून केलेल्या तपासातून अनेक बाबी समोर आल्या आहेत, त्याबाबत देशमुख यांच्याकडे सविस्तर जबाब नोंदविला जाईल, त्यासाठी २९ जून रोजी ११ वाजता हजर राहण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे.

दुसऱ्या समन्समध्ये कारण नमूद केल्याने आता देशमुख यांना हजर राहण्याशिवाय पर्याय नाही. अगदी अत्यावश्यक कारण उद्भवल्याशिवाय त्यांना चाैकशी टाळता येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, देशमुख यांचे तत्कालीन खासगी सचिव संजीव पालांडे व सहायक कुंदन शिंदे हे ईडीच्या कोठडीत आहेत. दोन दिवस त्यांच्याकडील कसून चौकशीतून आणखी काही गंभीर माहिती समोर येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. त्याबाबत देशमुख यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे.

....................................................