नवी दिल्ली/मुंबई : शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपाप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचा (सीबीआय) प्राथमिक चौकशी अहवाल (पीईआर) फोडल्याप्रकरणी त्यांचे वकील आनंद डागा व सीबीआयचे निरीक्षक अभिषेक तिवारी यांना दिल्ली न्यायालयाने दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली.
तिवारी यांना दिल्लीत बुधवारीच अटक करण्यात आली होती, तर ॲड. डागा यांना गुरुवारी सकाळी मुंबईत अटक करण्यात आली. सुमारे ९ तास कसून चौकशी केल्यानंतर ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला नेण्यात आले. त्यानंतर दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले.ॲड. डागा हे नागपूरचे असून, सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी याच्यासमवेत कट रचून ‘पीई’ रिपोर्ट फोडला व त्यामध्ये छेडछाड केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याप्रकरणी आणखी काही जणांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.
तिवारी हे वकील डागा यांच्या संपर्कात होते. त्यांच्यातील संभाषण हाती लागल्याने व पुरावे मिळाल्यावर या दोघांनाही अटक केल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले. सीबीआयने बुधवारी वरळीतील सुखदा इमारतीतील फ्लॅटमधून देशमुख यांचे जावई डॉ. गौरव चतुर्वेदी यांनाही ताब्यात घेतले होते. मात्र, त्यांचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना सोडून देण्यात आले.