ईडी म्हणे, अनिल देशमुख वारंवार ग़ैरहजर...
ईडीने दिले वारंवार गैरहजर असल्याचे कारण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचे नाव नसल्याचे ईडी सूत्रांनी सांगितले. अनिल देशमुख वारंवार गैरहजर राहत असल्याने त्यांच्याकडे अद्याप चौकशी झालेली नाही. त्यामुळेच सध्या तरी यात त्यांचे नाव नसल्याची माहिती समजते आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआयने या प्रकरणी चौकशी करत गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्याच्या आधारे गुन्हा दाखल करून ईडीने देशमुखांच्या स्वीय सहायक आणि खासगी सचिव यांना अटक केली आहे. ईडीने देशमुखांची मालमत्ता जप्त करत त्यांना तब्बल पाच वेळा चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र ते हजर राहिले नाहीत. याच दरम्यान, अनिल देशमुख यांना सीबीआयकडून क्लीन चिट देणारा आशय असलेला एक अहवाल लिक झाल्याने एकच खळबळ उडाली. सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल करून देशमुखांच्या वकिलांच्या टीममधील वकील आनंद डागा आणि सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांंना अटक केली. त्यापाठोपाठ देश सोडून जाऊ नये म्हणून ईडीने देशमुखांना लूक आउट नोटीस जारी केली आहे.
दुसरीकडे ईडीने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात देशमुखांचे नाव न आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या वेळी ईडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीत, अनिल देशमुख यांनी अफरातफरीसाठी विविध कंपन्यांचे जाळे विणल्याचा संशय आहे. मात्र, वारंवार समन्स बजावूनदेखील ते हजर राहत नसल्यामुळे सहभागाबाबत अस्पष्टता आहे. उलट समन्स रद्द करण्यासाठी त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे ईडी अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
.....
ईडीची न्यायालयात धाव...
देशमुख समन्स बजावूनदेखील हजर राहत नसल्यामुळे ईडीनेही भादंवि कलम १७४ अंतर्गत न्यायालयात धाव घेतल्याची माहिती समजते आहे. याबाबत ईडीकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. यामुळे देशमुखांच्या अडचणी वाढू शकतात.